नावफलक निर्मिती

एखाद्या इमारतीतील आलिशान सदनिका, टुमदार बंगला किंवा भरभक्कम वाडा पाहिला की, हे घर कुणाचे असेल असा विचार मनात येतो. नकळतपणे आपण दरवाजावर ‘नेमप्लेट’ आहे का, हे निरखू लागतो.
नेमप्लेट म्हणजे एखाद्या वास्तुचा मालक, मुख्य व्यक्तीचा पेशा, त्यांची आवडनिवड, अभिरुची आणि स्वभाव एवढ्या सगळ्या गोष्टी एकदम सांगणारी दरवाजावरील पाटी असते. कुठल्याही घराची सजावट ही दरवाजापासून सुरू होते. याचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे नेमप्लेट असते. आपण कोणाकडेही गेलो तरी नेमप्लेटवरचे नाव मात्र आपण लक्षपूर्वक वाचतो. नेमप्लेट आकर्षक आणि स्वागतशील असेल तर आपला मूडही प्रसन्न होतो. अशा नेमप्लेट बनविण्याचा व्यवसाय अलिकडे चांगलाच बहरत चालला आहे.
हा व्यवसाय करणाऱ्यास एखाद्या ग्राहकाकडून जेव्हा नेमप्लेटचे काम मिळते, तेव्हा अनेक गोष्टींचा विचार त्यांना करावा लागतो. त्यांच्या दरवाजाचे डिझाईन कसे आहे, त्याला अनुसरून नेमप्लेटचा आकार, नक्षीकाम, रंगसंगती कशी शोभून दिसेल हे पहावे लागते. कुटुंबातील व्यक्तींचा मुख्य पेशा काय आहे, हे लक्षात घेऊन त्यांचे समाजात विशिष्ट स्थान असल्यास तेही नमूद करावे लागते. त्यांची आवडनिवड तसेच नेमप्लेटवर कोणाची नावे घालायची आहेत, नावातील अक्षरांची शैली कशी हवी आहे, असे अनेक मुद्दे विचारात घ्यावे लागतात.
उदा. ॲडव्होकेट, डॉक्टर, अभियंते, क्रीडापटू, पर्यावरणप्रेमी यांच्या नेमप्लेटवर त्यांच्या पेशाप्रमाणे काही गोष्टी घेतल्या तर त्याला एक वेगळा साज येतो. उदा. एखाद्या डॉक्टरच्या नेमप्लेटवर विशिष्ट पद्धतीने ‘स्टेथोस्कोप’ टाकला तर ते शोभून दिसते. तिथे डॉ. राहत असल्याचे कळते.
काही नेमप्लेटवर प्रतिके हवी असतात. त्यात राजमुद्रा, बासरी, मोरपीस, पिंपळपान यांचा समावेश होतो. काहींना अक्षरे वेगळ्या शैलीत हवी असतात. हे सर्व या व्यावसायिकाला जाणून घ्यावे लागते.
बंगल्यांसाठीची अक्षरे वेगळी असतात. त्यासाठी ॲक्रिलिक लेटर्स वापरले जातात. नेमप्लेट योग्य आकारात कापण्यासाठी विशिष्ट लेसर मशीन वापरले जाते. यंत्र हाताळणी तसेच नेमप्लेट वेष्टनात गुंडाळणे यासाठी कामगार वर्गाचीही आवश्यकता असते. लेसर मशिनच्या सहाय्याने एल.ई.डी. नेमप्लेट साईन बोर्ड्सची निर्मिती केली जाते.
नेमप्लेटची किंमत साधारणत: पाचशे रुपयांपासून साडे तीन हजारपर्यंत असते. नेमप्लेटवरची कलाकुसर, कच्च्या मालाची किंमत, नेमप्लेटचा आकार, एकूण उत्पादनाची किंमत हे सर्व विचारात घेऊन नेमप्लेटची अंतिम किंमत ठरवली जाते.
अलिकडे कॅनव्हास पेंटिंगच्या फ्रेम्स, डिजिटल कॅनव्हास पेंटिंग असे नवीन प्रकारही आले आहेत. डिजिटल कॅनव्हास पेंटिंगमध्ये प्रथम चित्राची प्रिंट घेऊन ती कॅनव्हासवर लावली जाते. कॅनव्हास वारली पेंटिंग, वारली वॉल पेटिंग असे प्रकारही हल्ली खूप लोकप्रिय आहेत. त्यामुळे शहरांमध्ये तर याला खूप मोठा वाव आहे. यासाठी नेमप्लेट बनविण्याचे प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरु करावा.