कापडापासून चटई

लोक सर्वसाधारणपणे जुने तसेच शिलाईतून उसवलेले कपडे टाकून देतात. परंतु या कपड्यांपासून दरवाजावरील पायपुसणी आकर्षकपणे बनविता येतात. या पायपुसण्यांना बाजारातही चांगला दर मिळतो. ग्राहक आवडीने विकत घेतात. टाकाऊ कापडापासून पायपुसणी बनविण्याचा व्यवसाय अलिकडे महिला करू लागल्या आहेत. यासाठी प्रथम कापड पट्ट्यामध्ये कापून घेतले जाते. ती कापल्यानंतर समान लांबी व रुंदीच्या पट्ट्या कापतात. या पट्टयांच्या वळणदार वेण्या घालून त्यापासून पायपुसणी बनविली जातात. केसांची वेणी घालण्यासारखाच हा प्रकार असतो. त्यानंतर सुई दोऱ्याने ही पायपुसणी घट्ट शिवली जातात.
ही स्वच्छ करणे देखील सोपे आहे. घर स्वच्छ आणि नीटनेटके राहण्यासाठी यांची खूप गरज असते. पावसाळ्यात घरातील लोक बाहेरून मातीने भरलेले बूट आणि चप्पल घेऊन येतात. घरी मुले असतील तर गोंधळ वाढतो. अशा वेळी ही पायपुसणी उपकारक ठरतात.
अलिकडे महिला लहानमोठ्या आकारातील पायपुसणी बनवून विक्री करतात. ही प्रत्येक घराची गरज असते. त्यामुळे अर्थातच त्यांना ग्राहकही मिळतात. जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानांतही विक्रीला ठेवतात. यामुळे कापडाचा वापर होतो, आणि गरजही भागते. वेगवेगळ्या आकारातील पायपुसणी आकर्षक असल्याने मन वेधून घेतात. सुती कापड वापरल्यास ती पाणी चांगल्या प्रकारे शोषून घेतात. आकर्षक पायपुसणी घरालाही शोभून दिसतात. त्यामुळे गावागावांमध्ये अलिकडे बचत गटाच्या माध्यमातून महिला योग्य प्रशिक्षण घेऊन असा स्वयंरोजगार करून चरितार्थ चालविताना दिसत आहेत.