नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात बिष्टा, कर्हा , दुंधा, अजमेरसारखे किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातील दुंधेश्वर डोंगररांगेवर हे किल्ले आहेत. या किल्ल्याचा वापर चौकीचा किल्ला म्हणून जात होता. ‘बिष्टा’ किल्ला ‘बिजोट्याचा किल्ला’ या नावानेही ओळखला जातो. हा किल्ला ‘कोटबेल’ गावापासून जवळ आहे.
‘कोडबेल’ हे गाव ‘बिष्टा’ किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे गाव आहे. या गावातील बस स्थानकाच्या चौकातून बिष्टा किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग आहे. येथून कच्चा रस्ता चालू होतो. या रस्त्यावर डाव्या बाजूला सागाची झाडे आहेत. पुढे चालत जाताना अधुनमधून विरळ घरे, ओढा मिळतो. नदीच्या पात्रात बांधलेले धरण आहे. धरणाच्या भिंतीवरुन पलीकडे चालत गेल्यावर बिष्टा किल्ल्यासमोरचा डोंगर मिळतो. तो चढून गेल्यावर बिष्टा किल्ल्याच्या पायथ्यापाशी आपण पोहोचतो. बिष्टा किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे .
या किल्याष्वर पाण्याचे टाक आणि गुहा आहेत. हा गडमाथा लांबवर पसरलेला असून माथ्यावर ६ उद्ध्वस्त वास्तू दिसतात. ते पाहून परत टाक्यांपाशी आल्यावर गडफ़ेरी पूर्ण होते. गडमाथ्यावरुन कऱ्हा किल्ला, फ़ोपीरा डोंगर आणि अजमेरा किल्ला दिसतात. ‘कोडबेल’ गावातून किल्ला पाहून परत येण्यास चार ते पाच तास लागतात. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचण्यास एक ते दीड तास, किल्ला चढण्यास अर्धा ते पाऊण तास आणि किल्ला पाहण्यास अर्धा तास लागतो.