मुकेश खन्ना यांनी अलीकडेच महिलांचे कपडे घालून शो करणाऱ्या विनोदी कलाकारांवर टीका केली होती. तसेही ते अनेकदा मनोरंजन क्षेत्रातील ट्रेंड आणि कल्चरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना दिसतात. ‘शक्तीमान’च्या भूमिकेतून वर्षानुवर्षे लोकांचे मनोरंजन करणारे मुकेश खन्ना हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अली असगर यांनी ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ आणि ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आजीची भूमिका वर्षानुवर्षे केली होती. आता एका चॅट शोमध्ये मुकेश खन्ना यांनी अलीच्या आजी बनण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. मुकेश म्हणाले की, मला ही गोष्ट आवडत नाही.
गेल्या वर्षी अली असगर मुकेश खन्ना यांच्या चॅट शोमध्ये आले होते. अली कपिल शर्माच्या शोमध्ये आजीच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. याबाबत बोलताना खन्ना म्हणाले की, मला हे सर्व आवडत नाही. मुकेश खन्ना यांनी अलीच्या पात्राला ‘स्लट’ असे म्हटले होते. अली यांनी शक्तीमान अभिनेत्याच्या या विधानावर भाष्य केले. ते म्हणाले की, ”हे तुमचे स्वतःचे मत असू शकते. यावर मी काहीही बोलणार नाही. लोक नेहमी विचारतात की, मुलाचे रूपांतर मुलीत का झाले ? याचे एक कारण, माझ्या मते, माझ्यासारखी आजी कोणीही होऊ शकत नाही. जरी कोणी हे पात्र साकारले असते, तरी ते इतके दमदार झाले नसते.”