
रसिकांच्या चर्चेचा विषय ठरलेल्या ‘फुलवंती’ या भव्य चित्रपट प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. निर्माती प्राजक्ता माळीने तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा केली आहे. येत्या ११ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
प्राजक्ताने जोडलेल्या मोशन पोस्टरमध्ये एका सजलेल्या राजेशाही पालखीत भरजरी वस्त्रे आणि आभूषणे परिधान केलेली ‘फुलवंती’ दिमाखात बसलेली दिसत आहे. ही झलक पाहूनच ‘फुलवंती’ची भव्यता समजते. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘फुलवंती’ या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत आहे.
स्नेहल प्रविण तरडे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘फुलवंती’च्या भूमिकेत प्राजक्ता माळी दिसत आहे. स्नेहल तरडे या अभिनेत्रीने यानिमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील आजवरची सर्वात भव्यदिव्य, अविस्मरणीय अशी कलाकृती ठरू शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. मोशन पोस्टरमधील पार्श्वसंगीतावरून हा चित्रपट संगीतमय दिसत आहे.