
‘टॅक्स आणि इमिग्रेशन कन्सल्टन्सी नोमॅड कॅपिटलिस्ट’ ने २०२५ ची शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये आयर्लंडचा पासपोर्ट पहिल्या क्रमांकावर आहे. ‘नोमॅड कॅपिटलिस्ट’ ने जगभरातील १९९ देशांमधील पासपोर्टचे विश्लेषण केले. ही क्रमवारी ठरवताना पाच मुख्य घटक विचारात घेण्यात आले. त्यात व्हिसा-मुक्त प्रवास, कर प्रणाली, देशाची प्रतिमा, दुहेरी नागरिकत्व सुविधा आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांचा समावेश आहे. त्याच वेळी, गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय पासपोर्ट आणखी खाली घसरला आहे.
आयर्लंडचा पासपोर्ट पहिल्या क्रमांकावर आहे. आयर्लंडने हे स्थान एक मजबूत आंतरराष्ट्रीय प्रतिमा, व्यवसायासाठी अनुकूल कर धोरण व लवचिक नागरिकत्व धोरण या आधारावर मिळविले आहे. आयर्लंडचे नागरिक संपूर्ण युरोपियन युनियन आणि यूकेमध्ये व्हिसा-मुक्त प्रवासाचा आनंद घेतात. दुसरीकडे, पाकिस्तान, इराक, इरिट्रिया, येमेन आणि अफगाणिस्तान हे देश जगातील सर्वात कमकुवत पासपोर्ट असलेल्या देशांमध्ये आहेत.