मुंबईत अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ

राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त मुंबईत राजभवन येथे राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ झाला. वाढती लोकसंख्या, महानगरांची ऊर्ध्वदिशेने होणारी वाढ आणि वाढती औद्योगिक क्षेत्रे यामुळे अग्निशमन सेवेचे कार्य आव्हानात्मक झाले आहे. त्यावर उपाय म्हणून नव्या नगररचनेचा अभ्यास करणारी अग्निशमन संशोधन संस्था स्थापन केली जावी, असे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यावेळी मांडले.
यावेळी मुंबई आणि राज्यातील अग्निशमन दलातील ८ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदके प्रदान करण्यात आली.मुंबई अग्निशमन दलातील तसेच राज्याच्या इतर महानगर पालिका येथील ८ अग्निशमन अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गुणवत्तापूर्ण अग्निशमन सेवेकरिता जाहीर झालेले राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले.
महानगरांमध्ये बांधल्या जाणाऱ्या निवासी सोसायट्यांमध्ये अग्निशमनविषयी जनजागृती केली जावी, विद्यापीठांमध्ये युवकांसाठी अग्निशमन अभ्यासक्रम सुरु करावा, नियमांचे काटेकोर पालन केले जावे, अशा सूचना राज्यपालांनी यावेळी दिल्या.