बिहारमध्ये ४ ते १५ मे दरम्यान सातव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 पार पडणार आहेत. या स्पर्धेचा शुभंकर आणि बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी पाटणा येथे हे अनावरण केले. बिहारमधील पाटणा, गया, राजगीर, बेगुसराय आणि भागलपूरसह विविध शहरांमध्ये या स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे.
‘गजसिंह’ हा या स्पर्धेचा शुभंकर असून तो हत्तीची शक्ती आणि सिंहाच्या हृदयाचे प्रतीक आहे. नालंदा आणि बोधगयातील मंदिरांवरील कोरीव नक्षींमधून या शुभंकराच्या निर्मितीचा प्रेरणा घेतली असून बोधचिन्हाची प्रेरणा बिहारच्या समृद्ध सांस्कृतिक वारशापासून घेण्यात आली आहे. यातील नारंगी रंग हा उत्साह आणि निसर्गाचे प्रतिक आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांनंतर, देशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असलेल्या, या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेला विविध शाखांमधील देशभरातून 8 हजार 500 हून अधिक खेळाडू उपस्थित राहणार आहेत.