शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर

सन २०२३-२४ चे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात हे पुरस्कार जाहीर केले. एकूण ८९ पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

त्यात माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागतिक विजेते (आर्चरी) आदिती स्वामी, ओजस देवतळे , क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

पुण्यात शुक्रवारी, १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते हा पुरस्कार समारंभ होईल. सन २२०२२-२३ व २०२३-२४ अशा दोन वर्षांच्या पुरस्कार समारंभाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी दिली आहे.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, विधान सभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *