
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनसह जगभरातील देशांवर शुल्क लादले आहे. तथापि, ट्रम्प यांच्या शुल्कावरील निर्णयानंतर, अमेरिकन बाजारपेठ अस्थिरता दाखवीत आहे.
पहिल्या तिमाहीत, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत ०.३ टक्क्यांनी घट झाली आहे. वॉल स्ट्रीटवरील स्टॉक एक्सचेंजच्या बेंचमार्क निर्देशांकात, म्हणजेच ‘डाऊ जोन्स’आणि ‘एस अँड पी’ मध्ये घसरण नोंदवली गेली आहे. तथापि, ट्रम्प म्हणतात की, लोकांनी धीर धरावा. या शुल्कामुळे शेवटी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला फायदा होईल.
दरम्यान, ट्रम्प अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल मोठे दावे करत असले तरी, न्यूयॉर्कस्थित स्पार्टन कॅपिटल सिक्युरिटीजचे मुख्य बाजार अर्थशास्त्रज्ञ पीटर कार्डिलो यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेतील घसरणीसाठी ट्रम्पच्या निर्णयांना जबाबदार धरले आहे. तर ट्रम्प मिशिगनमध्ये म्हणाले की, आम्ही अमेरिका पुन्हा महान बनवू.