तुर्कीच्या भारतविरोधी भूमिकेमुळे देशभरात ‘बॉयकॉट तुर्की’ (Boycott Turkey) अभियानाला जोर मिळत आहे. तुर्कीने काही आंतरराष्ट्रीय मंचांवर भारताच्या अंतर्गत घडामोडींबाबत नकारात्मक वक्तव्ये केल्यानंतर भारतीय नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, सोशल मीडियावर #BoycottTurkey हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
या पार्श्वभूमीवर, अनेकांनी तुर्कीशी संबंधित वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः तुर्की बनावटीच्या सौंदर्यप्रसाधनं, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि पर्यटन सेवा यांचा निषेध करण्यात येत आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, तुर्कीच्या राष्ट्राध्यक्ष रेसेप तैय्यप एर्दोगन यांनी संयुक्त राष्ट्रांसह विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भारताच्या जम्मू-कश्मीर धोरणावर टीका केली होती. त्यामुळे भारतीय जनतेत नाराजी पसरली असून, ती आता ‘बॉयकॉट’ च्या रूपात उफाळून आली आहे.
दरम्यान, काही व्यापाऱ्यांनीही या अभियानाला पाठिंबा दर्शवला असून, तुर्कीशी संबंधित उत्पादनांचा पुरवठा थांबवण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय नागरिकांचा रोष वाढत असून, सोशल मीडियावर “भारतविरोधी देशांना सबक शिकवायला हवा” अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. काही नेत्यांनीही या अभियानाला अप्रत्यक्ष समर्थन दिले आहे.