महाराष्ट्र सरकार आणि ब्लॅकस्टोन ग्रुपमध्ये सामंजस्य करार

महाराष्ट्र सरकारने अमेरिकन गुंतवणूक कंपनी ब्लॅकस्टोन ग्रुपच्या उपकंपन्या XSIIO लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्यासोबत ५,१२७ कोटी रुपयांच्या थेट परकीय गुंतवणुकीचा (FDI) सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे राज्यात १० हून अधिक आधुनिक लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक पार्क्स उभारण्यात येणार असून, सुमारे २७,५१० थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार आहेत . या प्रकल्पांमध्ये पर्यावरणपूरक, डिजिटल-सक्षम पायाभूत सुविधा असलेल्या लॉजिस्टिक्स आणि औद्योगिक पार्क्सचा समावेश असेल, ज्यामुळे राज्यातील उत्पादन, वेअरहाऊसिंग आणि पुरवठा साखळी क्षेत्रांना चालना मिळेल .
हा करार मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बालगन आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सचे अध्यक्ष आर. के. नारायणन यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, MIDC चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासु, तसेच ब्लॅकस्टोनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कराराला “परिवर्तनात्मक भागीदारी” असे संबोधून, “या सहकार्यामुळे नागपूर, मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांमध्ये जागतिक दर्जाचे, ESG-अनुरूप औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स हब्स उभारण्याचा मार्ग मोकळा होईल,” असे मत व्यक्त केले. या करारामुळे महाराष्ट्रातील औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून, राज्याच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान होईल.