भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोची १०१ वी मोहीम अयशस्वी ठरली. आंध्रप्रदेशात श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोचे पी.एस.एल.व्ही सी-61हे यान पहाटे ५ वाजून ५९ मिनिटांनी पृथ्वी निरिक्षण उपग्रह’ ई.ओ.एस – झिरो नाईन’ हा उपग्रह घेऊन अंतराळात झेपावले. तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक समस्या आढळून आल्यामुळे ही मोहिम यशस्वी होऊ शकली नाही, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिली.
विविध क्षेत्रांसाठी उपयुक्त आकडेवारी आणि माहिती पृथ्वीवर पाठवण्याची तसेच कोणत्याही हवामानात उत्तम आणि स्पष्ट छायाचित्र काढण्याची क्षमता, सीमा भागात टेहळणी करण्याची क्षमताही या उपग्रहात होती. ही मोहिम चार टप्प्यांची असून, पहिल्या दोन टप्प्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली. इस्रोची ही मोहिम पुन्हा आयोजित केली जाईल, असे त्यांनी सांगितले.