
हात आणि बोटे सुंदर दिसण्यासाठी महिला नखांवर रंग (नेलपेंट) लावतात. नखांना रंग देऊन सजविण्याचे अनेक प्रकार आजकाल बाजारात दिसतात. निरनिराळ्या प्रकारच्या रंगांचे आजकाल नखांवर प्रयोग केले जातात; मात्र बऱ्याच वेळेस हे रंग चुकीच्या पद्धतीने लावण्यामुळे नखांचे सौंदर्य बिघडते; कारण या रंगांमध्ये हानिकारक रसायने असतात.
नखांना अशा पद्धतीने सजविताना काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळल्या पाहिजेत. नखावरचा जुना रंग काढून नवीन रंग देताना आधीचा रंग पूर्णपणे काढून टाकला पाहिजे. बऱ्याचजणींना वेळ नसल्याने आहे त्या रंगावरच त्या रंग देतात. असे करणे नखांसाठी मुळीच चांगले नाही. त्यामुळे नखांचे पोषण होत नाही. यासाठी नखे नेहमी ‘रिमूव्हर’ने स्वच्छ करून घ्यावीत; आणि मगच नवीन रंगाचा साज द्यावा.

नखावरील रंग काढण्यासाठी नेहमी चांगल्या ‘रिमूव्हर’चा वापर करावा. जर नखांवरील रंग नखांनीच खरडून काढलात तर यामुळे नखांवर ओरखडे उठतात. नखांचे सौंदर्य खराब होतेच; पण नखांची वाढही खुंटते. नखे कायम निरोगी राहण्यासाठी ही चूक कधीच करू नका. नखांना रंग लावल्यानंतर कमीत कमी अर्धा तास कोणतेही काम करू नका. जरी आपला रंग लगेच वाळला तरीही काही मिनिटे हात तसेच ठेवावेत. असे न केल्यास रंग व्यवस्थित वाळत नाही, आणि मग नखांमध्ये आणि त्यांच्याखाली असणाऱ्या कोशिकांमध्ये पसरतो. रंगामधील रसायने नखे आणि कोशिकांचे नुकसान करतात. यासाठी रंग सुकण्याची वाट पहा.