
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात ‘रोहिडा’ किल्ला आहे. या किल्ल्यास ‘विचित्रगड किल्ला’ म्हणूनही संबोधले जाते. पुणे जिल्ह्यातील हा एक महत्त्वाचा किल्ला असून पुण्यातील सर्वात रोमहर्षक गिर्यारोहण ‘ट्रेक’ पैकी एक म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. सह्याद्री पर्वतरांगांच्या अद्भुत जंगलात हा वसलेला आहे. ‘श्री शिवदुर्गा संवर्धन समुह’, वन विभाग आणि जवळपासच्या गावांच्या सहकार्याने मोडकळीस आलेल्या ‘रोहिडा’ किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु आहे.

हा किल्ला यादवांच्या काळात बांधला गेला. तिसऱ्या दरवाज्याच्या शिलालेखात असे नमूद केले आहे, की या किल्ल्याचा जीर्णोद्धार इ. स.१६५६ मध्ये विजापूरच्या मोहम्मद आदिलशाहने केला होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. पुरंदरच्या तहादरम्यान, शिवाजी महाराजांनी औरंगजेबला जे २३ किल्ले दिले, त्यात ‘रोहिडा’ देखील होता. इ. स. १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकला.
भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या किल्ल्यावर भोर संस्थानचे पंतसचिव यांचे राज्य होते. पुण्यापासून ६१ किलोमीटर अंतरावर असलेले ‘भोर’ हे सर्वात जवळचे शहर आहे. ‘भोर’ पासून ७ किलोमीटर अंतरावर ‘बाजरवाडी’ ही किल्ल्याच्या पायथ्याशी वस्ती आहे. भोरमध्ये उत्तम हॉटेल्स आहेत; आणि ‘बाजरवाडी’ आणि ‘खानापूर’ येथील छोट्या हॉटेल्समध्ये चहा आणि न्याहारी मिळते.
‘बाजारवाडी’ हायस्कूलच्या पश्चिमेला एका टेकडीवर, जिथे गिर्यारोहणाची पायवाट सुरू होते, रस्ता रुंद आणि अत्यंत सुरक्षित आहे. ‘ट्रेकिंग’चा मार्ग झाडे नसलेला आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचायला साधारण एक तास लागतो. गडावरील ‘रोहिडमल्ल’ मंदिरात रात्र काढता येते. किल्ला जीर्णोद्धार समितीचा भाग असलेले ‘बाजारवाडी’ ग्रामस्थ रास्त दरात राहण्याची व जेवणाची व्यवस्था करतात. गडाच्या मुख्य प्रवेशमार्गावर तीन दरवाजे आहेत. मुख्य प्रवेशद्वारावर ‘गणेशपट्टी’ आणि ‘मिहारब’ आढळतात. दुसऱ्या प्रवेशद्वारावर दगडी पाण्याची टाकी आहे. हे पाणी वर्षभर पिण्यासाठी उपलब्ध असते. येथे सिंहाची प्रतिमा आहे. ५७ पायऱ्या चढून गेल्यावर तिसरे प्रवेशद्वार आहे.
प्रवेशद्वाराच्या बाहेरच्या बाजूला एक खडक आहे, ज्यावर फारसी आणि मराठी लिखाण आहे. दोन्ही बाजूला हत्तीचे शीर असलेल्या मूर्ती आहेत. गडावरील ‘रोहिडमल्ला’ चे मंदिर सुस्थितीत आहे. ‘शिरवळे बुरुज’, ‘पाटणे बुरुज’, ‘दामुगडे बुरुज’, ‘वाघजाई’ बुरुज, ‘फत्ते बुरुज’ आणि ‘सदर बुरुज’ हे गडावरील बुरुज आहेत. काही साहित्यात ‘शिरजा बुरुज’चा उल्लेख आहे, पण त्याचे स्थान अनिश्चित आहे. गडाच्या दक्षिणेला खडकात खोदलेल्या पाण्याच्या अनेक टाक्या आहेत. सुमारे तासाभरात संपूर्ण किल्ला पाहिला जाऊ शकतो.