शेंगवर्गीय गवार
गवार ही शेंगवर्गीय भाजी असून कोवळ्या शेंगांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. सुकलेल्या बियांपासून उसळ बनवितात. ग्रामीण भागातील हे अतिशय लोकप्रिय पिक आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे ८९१० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होते. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश येथे जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून, हिरवळीचे खत म्हणून वापरकेला जातो. गवारीच्या पिकापासून निघणाऱ्या डिंकाला मोठी मागणी असल्यामुळे परकीय चलन मिळवून देणारे पिक म्हणून याकडे पहिले जाते. गवारीच्या शेंगांमध्ये फॉस्फरस, चुना, लोह इत्यादी खनिजे आणि अ, ब, क जीवनसत्वे बऱ्याच प्रमाणात असतात. गवारीच्या डिंकाचा कागद, कापड, सौंदर्य प्रसाधने आणि स्फोटकात उपयोग केला होतो.

गवार हे उष्ण हवामानातील पिक असून सरासरी १८ ते ३० अंश सेल्सिअस तपमानास हे पिक उत्तम येते. खरीपातील उष्ण व दमट हवेमुळे झाडांची वाढ चांगली होते. हिवाळी हंगामात या पिकांची लागवड फायदेशीर ठरत नाही. हे पिक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. उत्तम पाण्याचा चांगला निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते. गवारीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते. उन्हाळी हंगामात गवारीची लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करतात. गवार हे शेंगवर्गातील कोरडवाहू म्हणून पिक घेतल्यास त्यास खताची फारशी जरुरी भासत नाही.
बागायती पिकास लागवडीपूर्वी ५० किलो नत्र, ६० किलो पालाश द्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे. या पि का ला पाणी माफक प्रमाणात लागते; परंतु फुले आल्यापासून शेंगाचा बहार पूर्ण होईपर्यत नियमित पाणी द्यावे. ‘पुसा सदाबहार’ ही गवारीची सरळ व उंच वाढणारी जात असून उन्हाळी व खरीप हंगामासाठी शिफारस केलेली आहे. या जातीच्या शेंगा १२ ते १५ सेंमी लांब असून हिरव्या, कोवळ्या व बिनरेषांच्या असतात. शेंगाची काढणी ४५ ते ५५ दिवसांनी सुरु होते. ‘पुसा नावबहार’ ही जात उन्हाळी व खरीप या दोन्ही हंगामात चांगले उत्पादन देते. शेंगा १५ सेंमी लांब, कोवळ्या, हिरव्या रंगाच्या असतात. झाडांची सरळ वाढ होते. पानाच्या बेचक्यात शेंगाचा घोस असतो.

‘पुसा मोसमी’ ही अधिक उत्पादन देणारी जात खरीप हंगामासाठी चांगली असून या जातीच्या शेंगा १० ते १२ सेंमी लांब असून ही जात ७५ ते ८० दिवसात काढणीस सुरु होते. शेंगा आकर्षक, चमकदार, हिरव्या रंगाच्या असतात. या जातीत फांद्या अधिक प्रमाणात फुटून मुख्य खोड आणि फांद्याच्या टोकावर शेंगा येतात. ‘शरद बहार’ या जातीचे झाड उंच असून झाडाला १० ते १४ फांद्या असतात. शेंगा आकर्षक, मऊ, रशरशीत, लांब असतात. ही जात खरीप हंगामासाठी योग्य आहे. या पिकास भुरी, मर असे रोग होतात; तसेच मावा व तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव होतो. रोपावरच्या हिरव्या कोवळ्या पण पूर्ण वाढलेल्या शेंगांची नियमित तोडणी करावी. शेंगा जास्त दिवस झाडावर राहिल्यास त्यात रेषांचे प्रमाण वाढते आणि साल कठीण होऊन त्या लवकर शिजत नाहीत. शेंगाची तोडणी ३ ते ४ दिवसांतून एकदा करावी. सर्वसाधारणपणे हिरव्या शेंगाचे हेक्टरी १०० ते २०० क्विंटल उत्पादन मिळते.