
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ‘छत्रपती संभाजीनगर’ मध्ये घृष्णेश्वर मंदिर’ हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील दौलताबादपासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. ‘शिवपुराण’, ‘स्कंदपुराण’, ‘रामायण’, ‘महाभारत’ या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.
वेरूळ गावातील ‘येलगंगा’ नदीजवळ हे मंदिर असून छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. त्यानंतर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी मंदिराचा जीर्णोद्धार केला असून शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार केला आहे.

मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. या मंदिराला २७ सप्टेंबर, १९६० रोजी ‘राष्ट्रीय संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले.
येथे जायचे असल्यास औरंगाबाद विमानतळ घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. बस किंवा टॅक्सीने येथून सहजपणे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर गाठता येते. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक देशातील प्रमुख रेल्वे स्थानकांशी चांगले जोडलेले आहे. इथूनही बस किंवा टॅक्सीने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरापर्यंत पोहोचता येते.
मंदिर वेरूळ लेण्यांपासून सुमारे 1-2 किमी अंतरावर आहे. ‘अजिंठा लेणी’, ‘वेरूळ लेणी’, ‘बीबी का मकबरा’, ‘दौलताबाद’ किल्ला,’बौद्ध लेणी’, ‘सिद्धार्थ उद्यान’, ‘सलीम अली तलाव’, ‘बानी बेगम उद्यान’, ‘जैन लेणी’, ‘कैलास मंदिर’, ‘जामा मशीद’, आदी पर्यटन ठिकाणे येथून जवळ आहेत.
हे मंदिर वास्तूरचनेचा अतिशय सुंदर नमुना आहे. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे. मंदिराचा अर्धा भाग लाल पाषाणात, तर कळसाकडील अर्धा भाग हा विटा, चुन्यात बांधलेला आहे. मंदिराच्या भिंतीवर पौराणिक कथेतील दृश्य कोरण्यात आलेली आहेत. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचा कळस सोन्याच्या पत्र्याने मढवलेला आहे. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनी भागापासून पूर्वेकडच्या पायऱ्या खाली उतरल्यानंतर डाव्या बाजूस शिलालेख दिसतो.
येथे ‘शिवालय तीर्थ’ या नावाने प्रसिद्ध कुंड आहे. हे कुंड घृष्णेश्वर मंदिरापासून साधारण पाचशे मीटर अंतरावर आहे. हे तीर्थकुंड एक एकर परिसरात असून चारही बाजूने आत जाण्यासाठी प्रवेशद्वार आहेत. या कुंडाला एकूण ५६ दगडी पायऱ्या आहेत. या ‘शिवालय कुंडा’त महादेवाची आठ मंदिरे आहेत. ही मंदिरे भारतातील अष्टतीर्थांची प्रतिकात्मक बांधकामे आहेत, असे सांगितले जाते. यात उत्तरेस काशी तीर्थ, ईशान्येस गया तीर्थ, पूर्वेस गंगा तीर्थ, आग्नेयेला विरज तीर्थ, दक्षिणेस विशाल तीर्थ , नैॠत्येस नाशिक तीर्थ, इत्यादी तीर्थ आहेत.
पुराणातील अनेक कथा येथे मूर्तीरूपाने कोरल्या गेल्या आहेत. त्यात शिवपार्वती विवाह, ब्रह्मा, विष्णू ,गणेश यांच्या कथाही आहेत. महिन्यातील प्रत्येक सोमवारी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथे राज्यासह परप्रांतातून दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात.