माती खाण्याची सवय घालवा

लहान मुले मुळातच निरागस असतात. या बालबोध वयात त्यांना योग्य-अयोग्य काही कळत नाही. अनेकदा ही मुले अशा काही गोष्टी करतात, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचते. यापैकी एक म्हणजे माती खाण्याची सवय होय. बहुतांश लहान मुलांना माती खाण्याची सवय असते. ही सवय सामान्य मानली जाते; परंतु जर मुले दररोज आणि जास्त प्रमाणात माती खात असतील, तर ते त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. लहान मुलांची माती खाण्याची सवय हा एक आजार आहे. त्यामुळे मुलांच्या पोटात जंत होतात. बाळाला भूक लागत नाही. यामुळे मुले जेवायला बघत नाहीत. बालवयात मुलांच्या शारीरिक विकासासाठी त्यांना अधिक पोषकतत्वांची गरज असते. जेव्हा मुलांना आवश्यक पोषकतत्वे मिळत नाहीत, तेव्हा हा आजार होतो. मात्र काही घरगुती उपायांनी मुलांची माती खाण्याची सवय मोडता येते.

अनेकदा लहान मुले अशक्त असतात. त्यांच्या शरीरात लोहाची कमतरता असते. लोह आपल्या शरीरात अनेक महत्त्वपूर्ण कार्ये करते. त्याच्या कमतरतेमुळे गंभीर परिणाम होऊ शकतात. जर मूल सतत चिकणमाती खात असेल, तर तुमच्या मुलाची ‘हिमोग्लोबिन’ आणि लोहाची पातळी तपासून घ्या. लोहाच्या कमतरतेमुळे मुलांना माती खायची इच्छा होते. माती खाण्याच्या या सवयीपासून मुक्त होण्यासाठी मुलांच्या आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा. खाण्यातून लोह मिळण्यासाठी मुलांच्या आहारात बीट, हिरव्या भाज्या आणि डाळिंबाचा समावेश करावा.

मुलांची माती खाण्याची सवय सोडण्यासाठी केळी प्रभावी ठरतात. केळी हे पोटॅशियमयुक्त फळ आहे, जे लहान मुलांसाठी अत्यंत आवश्यक मानले जाते. त्यात असे अनेक पोषक घटक आढळतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यातील पोषकतत्त्वांमुळे मुलाचा शारीरिक विकास होण्यास मदत होते. जर मूल माती खात असेल, तर केळी कुस्करून घ्या. त्यात मध व दूध मिसळा आणि मुलाला भरवा. याने त्याची माती खाण्याची तलफ शांत होते. तसेच मुलाचे पोट नेहमी भरलेले असेल, तर त्यांची माती खाण्याची सवय मोडते.

माती खाण्याची सवय सोडण्यासाठी लवंग देखील खूप फायदेशीर आहे. लवंगाचे पाणी प्यायल्याने मुलांची माती खाण्याची सवय लवकर कमी होते. हे पाणी तयार करण्यासाठी प्रथम काही लवंग बारीक करून त्या पाण्यात घाला. ते पाणी उकळून घ्या. हे पाणी थंड करून गाळून घ्या. हे पाणी मुलाला दिवसातून तीन वेळा द्यावे. जर लहान मूल हे पाणी पीत नसेल, तर त्यात मध मिसळून त्यांना प्यायला द्या. लवंगाच्या पाण्याचे सतत सेवन केल्याने मुलाची माती खाण्याची सवय सुटते.

मुलांची माती खाण्याची सवय मोडण्यासाठी त्यांना रोज रात्री झोपताना भाजलेला ओवा खायला द्या. याने त्यांची माती खाण्याची सवय तर सुटतेच आणि पचनासंबंधी काही तक्रारी असतील, तर त्यापासूनही आराम मिळतो. तसेच बाळाला कॅल्शियमयुक्त आहार द्या. यामुळे मुलांची माती खाण्याची सवय मोडेल. उपचार घरगुती आणि परंपरेने चालत आलेले असले तरीही आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *