आंब्याच्या रसातील सांदण

साहित्य :
१ कप तांदळाचा रवा (इडली रवा ), १ कप आंब्याचा रस, पाऊण कप साखर, अर्धा कप किसलेले ओले खोबरे, पाव लहान चमचा ताजी कुटलेली वेलची पावडर, चिमूटभर मीठ,
तूप, पाणी, अर्धा लहान चमचा खाण्याचा सोडा (ऐच्छिक)

कृती :
कढईत मंद ते मध्यम आचेवर रवा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. एका मोठ्या पातेल्यात आंब्याचा रस, साखर नीट एकत्र ढवळून घ्यावी. नंतर भाजलेला रवा, ओले खोबरे, वेलची पावडर, मीठ आणि १ मोठा चमचा तूप घालून नीट एकत्र करून घ्यावे. साधारण पाऊण कप पाणी घालून नीट ढवळून एका तासासाठी बाजूला झाकून ठेवावे. एका तासानंतर मिश्रण चांगले फुलून येते. यात सोडा घालून पटकन ढवळून घ्यावे. तुमच्याकडे वेळ असल्यास अजून एका तासासाठी तुम्ही मिश्रण ठेवू शकता. मग सोडा घालायची गरज लागत नाही.

एका केकच्या गोल भांड्यामध्ये किंवा कूकरच्या गोल भांड्याला तूप लावून हे मिश्रण ओतावे आणि हलकेच डबा खाली आपटून एकसंध करून घ्यावे. मोदक पात्रात पाणी उकळवून त्यावर चाळणी ठेवावी . त्यावर हा टिन ठेवून मंद ते मध्यम आचेवर झाकून हे ‘सांदण’ २५ ते ३० मिनिटे वाफवून घ्यावे. इडलीच्या साच्यात सुद्धा छोटो-छोटी सांदणे वाफवून घेता येतात. ‘सांदणे’ वाफवून झाली की ती पूर्ण थंड झाल्याशिवाय काढायचा प्रयत्न करू नये; कारण आतून मऊसूत असल्याने ती तुटू शकतात. गरमागरम ‘सांदणे’ नारळाच्या दुधात वेलची व गूळ घालून खावयास द्यावीत. थोडा सुका मेवा वरून घालण्यास हरकत नाही!

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *