शेती मुळा
भाजीपाला पिकांमध्ये मुळा एक रब्बी पीक असून हिवाळ्यात त्याची लागवड उत्तम होते. मुळा लागवडीसाठी जमीन साधारण हलकी, रेताड, मध्यम आणि चांगल्या निचऱ्याची असावी. ‘सपाट वाफे’ किंवा ‘सरी वरंबा’ पद्धतीने देखील आपण मुळ्याची लागवड करू शकता. उष्ण हवामानात चांगल्या वाढू शकणाऱ्या मुळ्याच्या जाती हल्ली विकसित करण्यात आल्या आहेत. यामुळे आता मुळ्याचे पीक जवळजवळ वर्षभर घेता येते.

मुळ्याचे जमिनीत वाढणारे मूळ आणि वरचा हिरवा पाला यांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. मुळा कच्चाही खातात, त्याची शिजवून भाजी करतात, तो लोणच्यातही वापरतात. मुळ्याच्या हिरव्या पाल्याची तसेच त्याच्या शेंगांचीही भाजी करतात. मुळ्याच्या हिरव्या पानांमध्ये तसेच मुळ्यामध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्वे असतात. मुळ्यामध्ये चुना, फॉस्फरस, पोटॅशियम ही खनिजे असतात. ‘जपानीज व्हाईट’,’ गणेश सिंथेटीक’, ‘पुसा हिमानी’, ‘पुसा देशी’, ‘पुसा चेतकी’, ‘पुसा रेशमी’, या मुळ्याच्या काही जाती आहेत.
मुळ्याची लागवड करताना जमिनीची मशागत चांगली करणे आवश्यक आहे. पिक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे सुरूवातीच्या काळात पिक तणरहीत करावे लागते. साधारणपणे दोन निंदण्या करून घ्याव्या लागतात. काळी अळी, मावा, करपा या रोगांना मुळा बळी पडतो. मुळ्याची लागवड केल्यानंतर 40 ते 55 दिवसांनी मुळे काढणीसाठी तयार होतात. मुळे नाजूक आणि कोवळी असतानाच मुळ्याची काढणी करावी.

मुळा जास्त दिवस जमिनीत राहिल्यास कडक, तिखट होतो. तो खाण्यास योग्य राहत नाही. मुळे काढण्यापूर्वी शेतीला पाणी द्यावे आणि नंतर हाताने उपटून काढावीत. विक्रीस पाठविताना मुळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. किडलेली, रोगट मुळे बाजूला करावीत. मुळे पाल्यासह काढून विक्रीसाठी पाठवावीत. काढणीवेळेस मुळे जमिनीत मोडणार नाहीत, याची काळजी घ्यावी.