संत बाळूमामांचे आदमापूर

महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात भुदरगड तालुका आहे. येथील श्री क्षेत्र आदमापुर येथे संत बाळूमामा यांचे समाधीस्थान आहे, जेथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. बाळूमामा समाधी मंदिराचे संपूर्ण बांधकाम संगमरवरी दगडात केलेले आहे. जेव्हा मंदिरात प्रवेश केल्यावर प्रशस्त प्रार्थना सभागृह दिसते. शेकडो लोक एकाच वेळी राहतील, एवढे हे सभागृह भव्य आहे. सभागृहाच्या भिंतीवर बरेच मराठी श्लोक आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी असलेली बाळूमामांची आकर्षक मूर्ती लक्ष वेधून घेते. त्यांच्या उजव्या बाजूला त्यांचे गुरु ‘मुळे महाराज’ यांची प्रतिमा आहे. डाव्या बाजूला विठ्ठल-रुक्मिणी आहेत. जवळच ‘हालसिद्धनाथां’ची प्रतिमा आहे. बाळूमामांची अत्यंत आकर्षक मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते.

या मंदिरात बाळूमामांची समाधी आहे. वरच्या बाजूला दगडात कोरलेल्या पादुका आहेत. मंदिरातील गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. काही अंतरावर उभे राहूनच दर्शन घ्यावे लागते. बाळूमामांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन भाविक बाहेर ठेवलेल्या पादुकावर डोके ठेवतात. दर्शन झाल्यावर आपल्या डोक्यावर भंडारा लावला जातो. साखर, खडीसाखर आणि पेढा यांचे मिश्रण असलेला प्रसाद येथे दिला जातो. मंदिरात धातूपासून बनवलेला मेंढ्याचा पुतळा आहे. काही समस्या किंवा अडचणी असतील तर त्या मेंढ्याच्या कानात सांगू शकता. त्या पूर्ण होत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

भाविकांनी अर्पण केलेला नारळ त्यांना ‘प्रसाद’ म्हणून परत दिला जातो. मंदिराकडेच उंबराच्या झाडाखाली दत्तात्रेयांची मूर्ती आहे. भक्तांसाठी येथे आंबीलची व्यवस्था केलेली असते. मंदिराच्या उत्तरेस मोठे प्रसाद भवन आहे. अत्यल्प दरात भाविकांना पोटभरून प्रसाद मिळतो. प्रसाद भवनातील कपाटांत बाळूमामांनी वापरलेली भांडी आणि कपडे अजूनही आहेत.. मंदिरासमोर हत्तीचे दोन मोठे पुतळे असूनत्यामुळे मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर पडते. दर रविवारी व अमावस्येला आदमापूर येथे भाविकांची मोठी गर्दी जमते. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ७४ व्या वर्षी बाळूमामांचे आदमापूर येथे निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आदमापूर येथे समाधी मंदिर बांधले गेले. या मंदिराची देखभाल ‘श्री बाळूमामा संस्थान’ करीत आहे.

बाळूमामांच्या मेंढरांची संख्या चाळीस हजारांवर पोहोचलेली आहे, त्यांचा सांभाळ त्यांचे भक्त करतात. कोल्हापूर ते आदमापूर हा बसमार्ग साधारण ४२ किमी.चे अंतर आहे. येथे जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. रेल्वेने गेल्यास कोल्हापूर स्थानकावर उतरून कोल्हापूर-मुरगुड एसटी बसने आदमापुर येथे जावे. तसेच निपाणी- राधानगरी, कोल्हापूर-राधानगरी या एसटी बसनेही आपण आदमापूरला जाऊ शकता.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *