अकोला

महाराष्ट्रातील अकोला हे विदर्भातील महत्त्वाचे ठिकाण असून येथे पाहण्यासारखी अनेक स्थळे आहेत. येथील मिर्झाराजे जयसिंगांची छत्री व किल्ला प्रेक्षणीय असून ती पाहण्यासाठी आवर्जून येथे पर्यटक भेट देतात. गाविलगडच्या डोंगररांगांमध्ये असलेला बहामनी राजा यांनी बांधलेला ‘नर्नाळा’ हा सुमारे २२ चौ. कि.मी. क्षेत्रफळात पसरलेला व सत्तावीस दरवाज्यांचा प्राचीन किल्ला असून हे पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. नर्नाळा येथील अभयारण्यसुद्धा प्रसिद्ध आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असणारे विदर्भातील एकमेव कृषी संशोधन केंद्र अकोल्यात आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्यालय अकोला येथे आहे. येथील ‘बाळापूर’ हे ठिकाण हातमागावर तयार होणाऱ्या सतरंज्यांकरिता प्रसिद्ध आहे. या जिल्ह्यातील ‘पातुर’ या गावाला लागूनच वाकाटककालीन शैव लेणी आहेत.

बाळापूर तालुक्यातील ‘पारस’ येथील औष्णिक विद्युत केंद्र प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील अकोट, तेल्हारा, बाळापूर, मूर्तिजापूर ही सर्व कापूस केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. खळाळणारी पूर्णा नदी पर्यटकांना आनंद देते. ही अकोला जिल्ह्याची प्रमुख नदी आहे. ‘परम’ संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांचा जन्म अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात झाला. अकोला शहर हे ‘विदर्भातील कापसाची महत्त्वाची बाजारपेठ’ म्हणूनही ओळखले जाते. दणकट बैलांसाठीसुद्धा अकोला जिल्हा प्रसिद्ध आहे.

पुंडलिक महाराजांची समाधी मूर्तिजापूर येथे असून येथेच संत गाडगेबाबांनी स्थापन केलेली धर्मशाळाही आहे. अकोला जिल्ह्यातील ‘वारी’ या गावी रामदास स्वामींनी स्थापन केलेला ६ फूट मारुती प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील ‘तेल्हारा’ तालुक्यात ‘बारी-भैरवगड’ येथील ‘वान-प्रकल्प’ हा जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प पाहता येतो. महाराष्ट्रातील एकमेव मुष्टियुद्ध प्रशिक्षण अकादमी अकोला येथे कार्यरत असून अकोल्यात खादीचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होते.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *