
महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात ‘रेहेकुरी अभयारण्य’ आहे. ‘रेहेकुरी’ दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राणी ‘काळवीट’च्या अभयारण्याचे निवासस्थान आहे. या अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ उन्हाळ्याचा आहे. हे अभयारण्य आकारमानाने अतिशय लहान असून ‘ब्लॅकबक अभयारण्य’ या नावाने ओळखले जाते. अवघ्या २.५ चौ.कि.मी. क्षेत्रफळावर हे अभयारण्य असून खास ‘काळवीट’ हरणांच्या संरक्षणासाठी घोषित केले आहे. ‘काळवीट’ हा प्राणी नामशेष होण्याची भीती निर्माण झाली असताना ‘रेहेकुरी’ या अभयारण्यामुळे ते वाचले. काळवीट हा प्राणी भारतीय संस्कृतीचे महत्वाचे प्रतीक मानला जातो.
काळवीट प्राण्याचे अस्तित्व सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमध्ये व मध्य भारतातील प्राचीन दगडी चित्रात आढळून आले आहे. महाराष्ट्र शासनाने सन २०१५ मध्ये केलेल्या वन्यजीव सर्वेक्षणात रेहेकुरी अभयारण्यात काळविटांची संख्या ४५० ते ५०० असल्याचे आढळले. काळविटांची संख्या वाढल्याने व रेहेकुरी अभयारण्याचा आकार अतिशय लहान असल्याने येथे पर्यटकांना काळवीट आवर्जून पहायला मिळतात. रेहेकुरी अभयारण्यापासून ४० कि.मी.च्या अंतरावर ‘सिद्धटेक’ हे अष्टविनायक यात्रेतील प्रमुख गणपती मंदिर आहे. यमाई देवीचे मंदिर २५ किलोमीटरच्या अंतरावर आहे. रेहेकुरी हे अभयारण्य पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षित आणि महत्त्वाचे ठिकाण ठरत आहे. रेहेकुरी हे अभयारण्य वर्षभर खुले असते.

रेहेकुरी अभयारण्यातील जंगल हे शुष्क काटेरी वने या प्रकारात येते. अभयारण्याचा बहुतांशी भाग हा गवताळ कुरणे आणि बाभळीच्या वनांनी व्यापलेला आहे. येथे हिरव, खैर, बाभूळ, तरवट, बोर, कडूलिंब ही मोठी झाडे आढळतात. मारवेल, पवन्या, फुली, शेड्या, डोंगरी या गवती वनस्पती रेहेकुरी अभयारण्यात आढळतात. रेहेकुरी हे अभयारण्य काळवीट प्राण्यासाठी प्रसिद्ध असले तरीही येथे लांडगा, कोल्हा, चिंकारा, तरस, साळींदर, मुंगूस, खोकड हे वन्य प्राणी आढळतात. नाग, साप, धामण, अजगर, सरडे, घोरपड हे सरपटणारे प्राणी या अभयारण्यात बघायला मिळतात. रेहेकुरी या अभयारण्यात विविध पक्षीसुद्धा आढळतात. त्यात मोर, तितर, माळढोक, लावा, सातभाई, घार, सुतारपक्षी, चंडोल, कापशी आणि भारद्वाज हे पक्षी आढळतात. रेहेकुरी येथे निरीक्षणकुटी बांधलेल्या आहेत. विश्रांतीसाठी दोन कक्ष आणि पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे. या अभयारण्यात जाण्यासाठी दौंडहून ६० किलोमीटरच्या अंतरावर कर्जत हे गाव आहे.