कॅटरिंग व्यवसाय
खाद्यपदार्थ बनविण्याची आवड असणाऱ्यांसाठी कॅटरिंग व्यवसाय हा एक चांगला व्यवसाय आहे. हा सुरु करायचा असल्यास आपल्याला कोणते खाद्यपदार्थ बनविणे आवडते, याचा आधी विचार करा. इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच यामध्येदेखील वास्तविक रुची आणि आवड असणे आवश्यक आहे.

आपण कोणत्या प्रकारचे पदार्थ बनविणार आहात, हे ठरवा. भोजन थाळी बनवीत असाल तर या थाळीत कोणते पदार्थ असतील हे ठरवा. हा व्यवसाय एकदा करू लागलात की बाहेरच्या मागण्यासुद्धा आपोआपच येतात. आपण पुरस्कार सोहळे, शालेय कार्यक्रम, बैठका अशा ठिकाणी कामे घेऊ शकता. याकरिता आपली भोजन थाळी मात्र स्वादिष्टतेने भरलेली परिपूर्ण असायला हवी.
जर आपल्याला ‘बेकिंग’ करणे आवडत असेल, जमत असेल तर ‘कुकीज’ आणि ‘केक्स’ बनवू शकता. मग आपण केवळ बेकिंग कॅटरिंगचा विचार करा. जर आपणास थंड पेये बनविण्यामध्ये स्वारस्य असेल तर आपण वेगवेगळ्या प्रकारची उत्तम पेये बनवून त्याची विक्री करू शकता. विविध फळांचा वापर करून स्वतःचे उत्तम पेय ग्राहकांना देऊ शकता. याकरिता आधी आपणास काय करायचे आहे, हे निश्चित करावे. आर्थिकदृष्ट्या त्याची सांगड घालता आली पाहिजे. सुरुवातीला यासाठी जागा निश्चित करावी लागेल. स्वतःची जागा नसल्यास एखादी जागा भाड्याने घ्यावी लागेल.
आपल्या या व्यवसायात भिन्न अभिरुचीनुसार विविध वस्तू आणण्याचा प्रयत्न करा. आपण ज्या पाककलेत निपुण आहात त्याच कलेकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिल्यास त्याचा या व्यवसायात लाभ होऊ शकतो. शाकाहारी आणि मांसाहारी असे पुन्हा दोन प्रकार आहेत. यापैकी आपण काय करणार आहात हे ठरवायला हवे. या व्यवसायात केवळ एकाच पदार्थावर कुटुंबाचा उत्तम चरितार्थ चालवून यशस्वी झालेली माणसे या समाजात आहेत. यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातलेले असते. अखंड तप केलेले असते.
एकदा आपण आपल्याला नेमके काय आणि कसे करायचे आहे, हे ठरविल्यावर ते पदार्थ स्वतः बनवून पहा. आपल्या कुटूंबातील मंडळींना, मित्रमैत्रिणीना चव चाखण्यास द्या. त्यांच्याकडून प्रामाणिक अभिप्राय मागा. त्यानुसार पदार्थामध्ये बदल घडवीत चला. सगळ्यात महत्त्वाचा असतो, तो स्वतःचा अभिप्राय ! त्यामुळे ऐकावे जनाचे करावे मनाचे हेसुद्धा लक्षात असू द्या.

आपण बनविलेले पदार्थ देताना ते सुंदर दिसण्यासाठी त्याची सजावट करा . सरावाने परिपूर्णता येते. आपण आपला व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे तंत्र, वेळ आणि आवड असली पाहिजे. व्यवसायाला प्रारंभ करण्यापूर्वी आपल्याकडे आवश्यक परवानग्या आणि परवाने असल्याची खात्री करून घ्या. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) कडून अन्न आणि सुरक्षा परवाना मिळवा. तथापि, ज्यांची वार्षिक उलाढाल 12 लाख किंवा त्याहून अधिक आहे, त्यांच्यासाठीच तो अनिवार्य आहे, हे लक्षात घ्या.
आपल्या पदार्थांच्या किंमती निश्चित करा. आपली कागदपत्रे नीट ठेवा. आपला जमा-खर्च, पावत्या आणि उत्पन्नाचा मागोवा ठेवण्यासाठी स्वतःची एक पुस्तिका ठेवा. जम बसू लागला की अन्न वाहतुकीसाठी गाडी खरेदी करा. कर्मचाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करा. हे सेवा क्षेत्र आहे. आपण दिलेल्या चांगल्या सेवेमुळेच आपल्याकडे ग्राहक आकर्षित होणार, हे लक्षात ठेवा. सकारात्मक रहा. आपल्या सेवेच्या जाहिरातीसाठी समाजमाध्यमे व गुगलचा चांगला उपयोग करून घ्या.