आकर्षक दागिने निर्मिती
आकर्षक बनावट दागिने हा एक अलीकडे वाढत असलेला उद्योग आहे. अस्सल दागिने बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या जास्त किंमतीमुळे खरे दागिने खरेदी करणे सर्वसामान्यांना परवडणारे नसते. बनावट दागिने आकर्षक केले जात असल्याने अनेक तरुणी, स्त्रियांच्या हे पसंतीस उतरलेले आहेत.

कमी किमतीचा धातू आणि रत्नांपासून बनविलेले हे दागिने ‘इमिटेशन ज्वेलरी’ म्हणून ओळखले जातात. पितळ, निकेल, चांदी, पोलाद, चांदी, सोन्याचा मुलामा इत्यादी वापरून हे दागिने बनविले जातात.
उत्तम बनावट दागिने तयार करणे ही एक कला आहे. या क्षेत्रातील उद्योगांमध्ये उत्पादक, वितरक आणि किरकोळ विक्रेते यांचा समावेश होतो. भारतात प्रामुख्याने ऑनलाइन दुकाने व प्रदर्शनांद्वारे यांची विक्री केली जाते. स्थानिक जत्रादेखील मोठ्या संख्येने ग्राहकांना आकर्षित करतात. उत्पादनांची विस्तृत निवड, उत्तम शैली, अदलाबदल करण्यायोग्य वस्तू आणि बरेच काही उपलब्ध असल्यामुळे अलीकडे ऑनलाइन खरेदी करण्याकडे ओढा दिसून येतो. किरकोळ विक्रेत्याकडून खरेदी केल्यास गुणवत्ता आणि विविधतेची खात्री नसते.
हा व्यवसाय भारताच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वपूर्ण भाग झाला आहे. वाढत्या लोकसंख्येची गरज भागविणारा हा एक उत्तम व्यवसाय आहे. जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मुंबई तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जेम्स अँड ज्वेलरी, मुंबई यांसारख्या जागतिक दर्जाच्या संस्था मुंबईत कार्यरत आहेत. मुंबईमध्ये १११ एकरांवर पसरलेले ‘सीप्झ एसईझेड’ असून त्यामध्ये ७ प्रमाणित नक्षीकाम कारखाने आणि ३ रत्ने व आभूषणांचे कारखाने आहेत.
कच्च्या हिऱ्यांच्या थेट पुरवठ्यासाठी ‘भारत डायमंड बोर्स’ मध्ये विशेष अधिसूचित क्षेत्र आहे. महाराष्ट्रात कोल्हापुरातील ‘हुपरी’ येथील विशेष चांदी क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा असून चांदीसाठी खास बनविलेल्या सामायिक सुविधा एकत्रितपणे उपलब्ध आहेत.

हैद्राबादचा बेगम बाजार, चेन्नईचे जॉर्ज टाऊन, दिल्लीचे सरोजिनी नगर, बंगळुरुची कमर्शिअल स्ट्रीट, कोलकाता नवीन बाजार, दिल्ली जनपथ हे या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असणारे बाजार आहेत.
येत्या काही दशकांमध्ये, अभिरुची बदलल्यामुळे कमी किमतीच्या या आकर्षक दागिन्यांकडे ग्राहक वळत असून संपूर्ण उद्योगात सुधारणा होण्याची आशा निर्माण झाली आहे. कच्च्या मालाची वाढती किंमत आणि किरकोळ बाजार हे या दागिन्यांसमोरील मोठे आव्हान आहे. दागिन्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या खंडित वितरण साखळीमुळे व्यवसायाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, ज्यामुळे कच्च्या मालाच्या किमती अनेकदा वाढू शकतात.
बनावट दागिन्यांच्या उद्योगामध्ये भारतातील आर्ची इम्पेक्स, वीटी इम्पेक्स, पद्मावती आभूषण, ट्रेंडी बाऊबल्स, वर्धमान ज्वेलर्स, एलेक्स आभूषण ऑनलाइन, कन्हाई ज्वेलर्स, ज्वेल्स फॅशन, गॅलेक्सी होलसेल, इ. महत्त्वाचे उत्पादक आहेत. हे दागिने भारतातून 177 देशांना पुरवले जातात.