
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हापूस आंब्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या देवगड तालुक्यात ‘किल्ले देवगड’ हा किल्ला आहे. पूर्व-पश्चिम पसरलेली तटबंदी, त्याभोवती असलेला २०-२५ फूट खोल खंदक, दीपगृह आणि पश्चिमेला दूरपर्यंत दिसणारा अथांग निळा समुद्र ही या किल्ले देवगडची शान आहे.

हा किल्ला नेमका कोणी बांधला, याबद्दल निश्चित माहिती मिळत नाही. दरवाजाची गोमुखी बांधणी पाहता हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला असावा, असा कयास काही इतिहासकार मांडतात. देवगड समुद्रकिनाऱ्याच्या एका बाजूला पवनचक्की असलेले पठार आहे. दुसऱ्या बाजूला उत्तर पठारावर १०० एकर परिसरात देवगड किल्ला पसरलेला आहे. रस्त्याने थेट किल्ल्याच्या दारापर्यंत जाता येते. किल्ल्याच्या आत हनुमानाचे स्थान असून तिथे आजही पूजा केली जाते. किल्ल्यावर बांधकामाचा एकच अवशेष आहे.
देवगड नदी किल्ल्याच्या पायथ्याशीच अरबी समुद्राला येऊन मिळते. पूर्वी नदीतून होणाऱ्या व्यापारी आणि सामरिक वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी देवगड किल्ल्याचा चौकी म्हणून उपयोग होत असावा, असा निष्कर्ष काढता येतो. येथे दिवसभर बसून सागराची विविध रूपे न्याहाळता येतात.