
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात कोंडुरा समुद्रकिनारा आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक आरती प्रभू यांच्या लेखणीने हा किनारा लोकप्रिय झालेला आहे. हा किनारा मनाला भावतो. म्हणूनच तर त्याला प्रभूंच्या लेखनात स्थान मिळाले.
दोन टेकड्यांच्या मध्ये असणारा हा किनारा आहे. कल्पवृक्षांच्या शीतल छायेत तो विसावला आहे. कोंडुऱ्याची छोटीशी पुळण भरतीच्या पाण्याने चिंब भिजून जाते. ते दृश्य मनमोहक असते.

कोंडुरा समुद्रकिनारा हा कोकण किनाऱ्यावरील दुर्मिळ किनाऱ्यांपैकी एक मानला जातो. येथील वाळू रुपेरी चकचकणारी आहे. कोंडुरा हे एक छोटेसे गाव आहे. येथे ‘कोंड’ नावाच्या छोट्याशा टेकडीवर एक छोटी गुहा आहे. या गावावरूनच या किनाऱ्यास नाव मिळाले.
हा किनारा शांत आहे. येथे पर्यटकांची गर्दी नसते. मनास विरंगुळा देणाऱ्या या सागरकिनाऱ्यास अवश्य भेट द्यावी.