अब्जाधीश न्हावी… रमेश बाबू

ज्या कामावर आपले प्रेम आहे ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केल्यास आजच्या जीवघेण्या स्पर्धात्मक व्यावसायिक युगातही घट्ट पाय रोवून उभे राहणे शक्य होते, हे बंगळुरूच्या रमेश बाबूने आपल्या जीवनप्रवासातून दाखवून दिले आहे.

व्यवसाय कोणताही असो, त्यामध्ये आव्हानं ही येणारच. मात्र, आव्हानाचे संधीत रुपांतर करून त्याचा धैयाने सामना केल्यास हमखास यश मिळते, असा कानमंत्र रमेशने दिला आहे.

तुमच्याकडे दूरदृष्टी असेल, तुम्ही प्रामाणिक असाल आणि कठोर मेहनत करण्याची तुमची तयारी असेल, तर जीवन किंवा व्यवसायात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही, असे व्यावसायिक वर्तुळात नेहमीच म्हटले जाते. त्यात तथ्यही आहे. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून झेप घेत यशोशिखर गाठले आहे, अशी असंख्य उदाहरणं देता येतील. अशातीलच उदाहरणं ही इतरांचे प्रेरणास्थान बनतात आणि त्यातूनही अनेक जण जीवनात यशस्वी होतात.

देशाचे आयटी हब म्हणून नावारुपास आलेल्या बंगळूरु शहरात राहणाऱ्या रमेश बाबू हा खऱ्या अर्थाने एक स्टार आहे. रमेश बाबूचे शहरात केशकर्तनालय (सलून) आहे. परंतु आज तो असाधारण संपत्ती असलेला साधारण व्यावसायिक आहे. रमेश बाबू आज अब्जाधीश असून, त्यांच्याकडे ६७ वेगवेगळ्या प्रकारच्या सुमारे २०० कार आहेत. मोठमोठे राजकीय नेते, लष्करी अधिकारी आणि सलमान खान, आमिर खान, ऐश्वर्या राय बच्चन यांच्या सारखे दिग्गज कलावंत रमेश बाबूंचे ग्राहक आहेत. जवळपास दररोज रमेश बाबू आपली ३.१ कोटींची अलिशान सेल्स रॉयसी घोस्ट चालवत कामाच्या ठिकाणी येतो.

ज्याप्रमाणे एखाद्या ग्राहकाच्या केसांना अगदी मन लावून आकार देतो. अगदी त्याचप्रमाणे मी माझ्या रॉयसीचा डॅशबोर्ड अत्यंत काळजीपूर्वक हाताळतो, असे रमेश सांगतो. विशेष म्हणजे अशी लक्झरी कार असलेल्या बंगळुरू शहरात फक्त पाच व्यक्ती आहेत आणि रमेश बाबू हा त्यापैकीच एक. अतिशय कष्टाने कमावलेल्या पैशातून बाबूने ही सेल्स रॉयल्सी खरेदी केली आहे. केशकर्तनालयाच्या उत्पन्नातून जे पैसे वाचले त्यातून रमेशने १९९४ साली एक मारुती ओमनी खरेदी केली. केशकर्तनालयात ग्राहकांच्या केसांना विविध आकार देतानाच रमेशने ओमनी भाडेतत्त्वावर देण्याचा व्यवसाय सुरू केला. ही कल्पना रमेशची आई ज्यांच्याकडे घरकाम करायची त्या नंदिनी अक्का यांनी त्याला सुचविली होती.

त्यानंतर आपले काम अत्यंत प्रामाणिकपणे करणाऱ्या रमेशच्या जीवनात प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने घडत गेली आणि मग खऱ्या अर्थाने इतिहास लिहिला गेला. २००४ उजाडता उजाडता रमेशचा टॅक्सी व्यवसाय चांगलाच बहरला. त्यावेळी सात नियमित कार रमेशकडे होत्या. गेल्यावर्षी मात्र त्याच्याकडे असलेल्या कारची संख्या तब्बल २०० झाली आणि यामध्ये ७५ वेगवेगळ्या प्रीमियर कार आहेत. यामध्ये मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, ऑडी काही अलिशान लक्झरी व्हॅन्स आणि अर्थातच या सर्वांवर मात करणारी रोल्स रॉयसी घोस्ट. रमेशने २०११ साली ही घोस्ट खरेदी केली.

स्वकष्टाने जीवनात यश कमावणारा पुरुष किंवा स्त्री प्रमाणे रमेश बाबूने फक्त केशकर्तनालयातून मिळणाऱ्या उत्पन्नावर हा सर्व डोलारा उभा केला, असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे. केशकर्तनालयातून त्याचे उत्पन्न फारसे नसले तरी कार भाड्याने देण्याच्या म्हणजेच टॅक्सीच्या व्यवसायातून रमेश भरपूर उत्पन्न कमावतो आणि त्यातूनच आज त्याचे नशीब बदलले. म्हणूनच आज अब्जाधीश असलेला रमेश बाबू हा देशातील सर्वांत श्रीमंत हेअरस्टाईलिस्ट पैकी एक आहे. रमेश बाबूला फॅन्सी कार जवळ बाळगण्याची खूप हौस आहे आणि विशेष म्हणजे प्रत्येक कारची खूपच काळजी घेतात.

अर्थात रमेश बाबूचा इथपर्यंतचा प्रवास अतिशय खडतर असाच आहे. परंतु आतापर्यंतच्या जीवनप्रवासात आलेल्या कोणत्याही संकटामुळे खचून न जाता रमेशने धैर्याने प्रत्येक आव्हान पेलले आणि म्हणूनच आज तो यशाच्या शिखरावर विराजमान आहे.

रमेश आता आपल्या ताफ्यात स्टेच लिमोजची भर घालण्यात उत्सुक आहे. रमेश आपल्या रोल्ससाठी दरदिवसाला ७५ हजार रुपये भाडे आकारतो आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे अधिकारी, बॉलिवूड आणि टॉलिवूडचे कलावंत हे त्यांचे विशेष ग्राहक आहेत. रमेशकडे फक्त कारचाच ताफा आहे, असे नसून त्याच्याकडे १६ लाखांची महागडी सुझुकी इंटूडर बाईक पण आहे. रमेश ही बाईक साधारणपणे आठवड्याच्या शेवटी वापरतो आणि ती त्याने खाजगी वापरासाठीच ठेवली आहे.

विशेष म्हणजे स्वकष्टाने यश मिळवत अब्जाधीश झाल्यानंतरही रमेशचे पाय अजूनही जमिनीवरच आहे. केशकर्तनालयातील आपल्या कौशल्याचा रमेश अजूनही उपयोग करतो आणि प्रत्येक ग्राहकाकडून फक्त १०० रुपये घेतो. जोपर्यंत हातात बळ आहे, तोपर्यंत हे काम सुरुच ठेवणार असल्याचे रमेशने स्पष्ट केले. आज देशभरात एक अब्जाधीश न्हावी म्हणून नावरुपास आल्यानंतरही रमेशला आपल्या भूतकाळाची आठवण आहे.

संयम, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कठोर मेहनत या गुणांमुळेच रमेश आज यशोशिखरावर आहे. मला जे योग्य वाटले तेच मी प्रामाणिकपणे केले आणि हेच माझ्या यशाचे गमक आहे, असे रमेशने हसतहसत सांगितले. रमेशचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर आपल्यापैकी अनेक जण यशोशिखराच्या दिशेने वाटचाल करू शकतो, एवढे निश्चित! १९७९ साली रमेश फक्त नऊ वर्षाचा असताना छोटेसे सलून चालविणारे त्याचे वडील स्वर्गवासी झाले. लहान रमेशसह कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वडिलांनी मागे सोडलेले सलूनचे दुकानच फक्त होते. मात्र, रमेश लहान असल्याने आईने ते सलून पाच रुपये रोज याप्रमाणे भाडेतत्त्वावर दिले आणि मुलांचे पालनपोषण करण्यासाठी दुसरीकडे घरकाम करण्यास सुरुवात केली.

रमेशच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच पैशावर चालत असे. परंतु, नंतर काकांसोबत वाद झाल्याने त्याने कुटुंबाचे सलून सोडले. शिक्षणाला प्राधान्य दे, या आईच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत रमेशने रात्री उशिरापर्यंत काम करून आपले कौशल्य वाढविण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याला यशही मिळाले. १९९१ साली रमेशने ‘इनर स्पेस’ नावाचे स्वत:चे सलून सुरु केले आणि तिथूनच त्याचा उत्कर्ष सुरू झाला. लवकरच शहरातील उच्चभ्रू लोकांमध्ये त्याचे सलून लोकप्रिय होत गेले. या व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नापैकी जे पैसे वाचले त्यातून रमेशने एक मारुती ओम्नी घेतली आणि भाडेतत्त्वावर देण्यास प्रारंभ केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि रमेशने हळूहळू सहा ते सात कार खरेदी केल्या.

अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या रमेशने २००४ साली आपल्या ताफ्यात ४० लाखांची एक लक्झरी कार खरेदी केली. त्यावेळी ४० लाख ही खूप मोठी रक्कम होती. रमेशच्या या अलिशान कारलाही चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याने आणखी काही कार खरेदी केल्या. प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची वृत्ती, नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणणे आणि आपल्या प्रत्येक निर्णयाबाबत प्रचंड आत्मविश्वास असलेल्या रमेशचा टॅक्सी व्यवसाय चांगलाच बहरला. मात्र, आतापर्यंतच्या प्रवासात रमेशला अनेक अडथळे पार करावे लागले, अनेक आव्हानं आणि संकटेही आली. काही दिवसांपूर्वीच त्याच्याकडे असलेल्या वाहनांच्या ताफ्यामुळे त्याला तीन कोटी इतका पथकर भरावा लागला. दोन अधिक दोन चार, असे करत त्याने ही रक्कम चुकती केली. उर्वरीत काही रक्कम वर्षभरात भरण्याचे आश्वासन रमेशने दिले आहे.

Leave A Comment:

Your email address will not be published. Required fields are marked *