सातपुड्यात आढळले वैदिकपूर्व शिवलिंग
सातपुडा पर्वतरांगांमध्ये इतिहास अभ्यासकांनी पुरातन शिवलिंगाचा शोध लावला असून हे शिवलिंग वैदिकपूर्व काळातील असल्याचा दावा केला आहे. जिथे हे शिवलिंग सापडले ते ठिकाण अमरावतीपासून ८० किलोमीटर अंतरावर आहे. अमरावतीचे ज्येष्ठ संशोधक डॉ. व्ही. टी. इंगोले यांच्या नेतृत्वाखालील मंडळींनी हे शिवलिंग शोधून काढले आहे.

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या या सीमावर्ती परिसरात अनेक ‘चित्रगुहा’ असून त्यापैकी एका चित्रगुहेत हे शिवलिंग आढळले आहे. याच पर्वतरांगांमध्ये सन २००७ मध्ये इंगोले यांच्या नेतृत्वाखालील मंडळींनी या ‘चित्रगुहां’चा सर्वप्रथम शोध लावला होता.
दरम्यान, या शिवलिंगावर लाल रंग दिसत आहे. कदाचित तो पूजेकरिता वापरला गेला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. वैदिकपूर्व काळात शिवलिंग पूजा होत होती. या दगडांच्या कालावधीचा अभ्यास केल्यावर हे शिवलिंग वैदिकपूर्व काळातील असावे, असा निष्कर्ष निघत असल्याचे डॉ. इंगोले यांनी सांगितले.

हे शिवलिंग नैसर्गिकरित्या तयार झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवलिंगाची उंची सुमारे २० फूट आहे. खरे तर हे शिवलिंग त्यांना सन २०१२ साली आढळले होते. मात्र, प्रसिद्धी केल्यावर त्या जागेचे आणि शिवलिंगाचे नुकसान होऊ शकते, या भावनेने ही माहिती पुढे आणली नव्हती.