कागदी कापडी पिशव्या निर्मिती
प्लास्टिक पिशव्या आणि इतर प्रकारच्या छोट्या मोठ्या पिशव्यांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर पातळ प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली गेली. यामुळे बाजारात कागदी पिशव्या आणि कापडी पिशव्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कोणतीही छोटी मोठी खरेदी केल्यानंतर दुकानदारांनी वजनाने हलक्या आणि वापरण्यास सोयीस्कर असल्याने अशा प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. लोकांच्या ‘वापरा आणि फेका’च्या सवयीमुळे पिशव्यांचा मोठा कचरा इतरत्र विखुरलेला दिसतो. अशा प्लास्टिक कचऱ्याचे विघटन होत नसल्यामुळे निसर्गचक्रानुसार प्लास्टिकचे विघटन न केल्यामुळे तो प्लास्टिक कचरा वर्षानुवर्षे जमिनीत तसाच पडून राहतो.

अशा प्लास्टिकच्या पातळ कॅरीबॅगमधून खाद्यपदार्थ फेकून दिल्याने भटके प्राणी आणि कुत्रे हे खाद्यपदार्थ पिशवीसह खातात. हा प्लास्टिक कचरा पचत नसल्याने तो जनावरांच्या पोटात राहतो. त्यामुळे भटक्या जनावरांचा वेदनेने मृत्यू होतो.
प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे निसर्गाचा आणि अप्रत्यक्षपणे मानवी जीवनचक्राचा नाश होतो. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी झाला असून पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचा, तसेच कागदी पिशव्यांचा वापर वाढला आहे. आज छोट्या मोठ्या खरेदीच्या वेळी दुकानदार, मॉल्समधील विक्रेते ग्राहकांना कागदी किंवा कापडी पिशव्या देताना दिसतात.
अशा पिशव्यांच्या वाढत्या मागणीमुळे कागदी आणि कापडी पिशव्या देण्याचा व्यवसाय गृहोद्योग म्हणून केला, तर निश्चितच चांगला नफा आणि संपूर्ण कुटुंबाला रोजगार मिळू शकतो. कागदी पिशव्या तयार करण्यासाठी कागदाचा वापर केला जातो.
या उद्योगासाठी कच्चा माल म्हणून केवळ चांगल्या प्रतीचा कागद आवश्यक असतो. औषधांची दुकाने, स्टेशनरी दुकाने, किराणा दुकाने, धान्य दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने याठिकाणी आपण आपल्या पिशव्या विक्रीस ठेऊ शकता. कापडी पिशव्यांसाठी तुम्ही नवीन किंवा जुने, परंतु स्वच्छ कपडे वापरू शकता. टिकाऊ कापड खरेदी करून त्याच्या छोट्या मोठ्या पिशव्या शिवून व्यापाऱ्यांना देऊ शकता. याचा आपला व्यवसाय वाढण्यास उत्तम फायदा होईल आणि विक्रीसाठी देताना, तर नवीनच कापड गरजेचे असेल.
कागदी पिशव्यांसाठी आपल्याला हव्या त्या आकारातील योग्य कागदी तुकडे घेऊन त्यावर गोंद चिकटवून पिशव्या तयार करा. महिला आणि पुरुष या पिशव्या घरी बसून अगदी सोप्या पद्धतीने, कमी जागेत, कमी भांडवलात तयार करू शकतात. कापडी पिशव्यांसाठी कापड आणि शिवणयंत्र एवढे साहित्य लागेल. कापडी पिशव्यांवर दुकानदाराला जाहिरात करायची असल्यास तशीसुद्धा आपण करू शकता. त्यासाठी विशेष यंत्रसामग्री येते, ती खरेदी करावी लागेल.

थोडी कल्पनाशक्ती वापरून, नाविन्यपूर्ण पिशव्या बनवून आपण व्यवसाय वाढवू शकतो. महिला, पुरुष, बेरोजगार उद्योजक ज्यांच्याकडे भांडवलाची कमतरता आहे त्यांनी त्यांच्या रोजगाराच्या गरजेसाठी हा व्यवसाय निवडला पाहिजे. प्रत्येक माणूस कधी ना कधी बाजारात जाऊन काहीतरी विकत घेतो. त्यामुळे प्रत्येकाला पिशव्या लागतात. प्रत्येक माणूस स्वतःचा ग्राहक असतो. तुम्ही किराणा दुकान, औषधांचे दुकान, मॉल्स, मिनी मार्केट, खाद्य विक्रेते, मिठाईची दुकाने, स्टेशनरी दुकाने येथे तयार पिशव्या विकू शकता.
बाजारातील व्यापाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून बाजाराच्या मागणीनुसार आवश्यक डिझाईनच्या पिशव्यांसाठी ऑर्डर मिळवू शकता. विशिष्ट वजनाच्या छोट्या आणि मोठ्या आकाराच्या आकर्षक पिशव्या किरकोळ, घाऊक, डोअर मार्केटिंग पद्धतीने विकल्या जाऊ शकतात. कापडी पिशव्या आणि कागदी पिशव्यांसाठी रंगीबेरंगी नवीन जुने कापड, धागा, कागद, गोंद हा कच्चा माल आहे. व्यवसाय वाढल्यास आपण यंत्रसामग्रीही खरेदी करून उत्तम पिशव्या बनवू शकता.