विविधरंगी डेलिया
‘डेलिया’ हे एक आकर्षक फूल आहे. सदासर्वदा टवटवीत दिसणाऱ्या या फुलांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. ही विविध रंगांची फुले बाजारात ग्राहकांची मागणी खेचून आणतात. सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत मैदानी भागात डेलियाची लागवड केली जाते. डोंगराळ भागात एप्रिल महिन्यात सुरुवात करतात.

विशेषतः उत्तर भारतात या फुलांची शेती केली जाते. येथे बियाणे रोपवाटिकेमध्ये सप्टेंबरच्या मध्यापासून ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पेरले जाते. तीन ते चार आठवड्यांत या बियाण्यास अंकुर येऊन ते पुनर्लावणीसाठी तयार होते. लागवडीपासून ९० ते १०० दिवसांच्या आत जानेवारीच्या मध्यापर्यंत ही फुले फुलण्यास सुरुवात होते. एप्रिलपर्यंत ही फुले मिळतात.
रोपाची खालची पाने काढून टाकली जातात. ‘रूट-प्रोमोटिंग हार्मोन’ ही एक लागवड पद्धत असून तिचा अवलंब केला जातो. वाळू आणि पानांचा साचा किंवा कुजून रुपांतर झालेले वनस्पतीजन्य पदार्थ या शेतीसाठी वापरल्यास पीक चांगले येते. अनेक ठिकाणी डेलिया सामान्यतः कुंडीतल्या वनस्पती म्हणून वाढतात. कुंडीतील वनस्पतींकडे जमिनीतील वनस्पतींपेक्षा जास्त लक्ष देण्याची गरज असते.

डेलिया मध्यम पोत असलेल्या मातीमध्ये चांगली वाढते. डेलियाला सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. जेथे 6 ते 8 तास सूर्यप्रकाश मिळू शकेल अशा ठिकाणी ही कुंडी ठेवावी. सावलीत वाढल्यास ते रोप दुबळे आणि कमकुवत होते.
रोपांचा वाफा तयार करायचा झाल्यास तयार केलेल्या वाफ्यात 4 ते 5 किलो चांगले कुजलेले शेणखत टाकावे. युरियाचा वारंवार वापर टाळावा. युरीयामुळे या रोपाला किंवा फुलांच्या गुणवत्तेला फारसा फायदा होत नाही.