वेल्डिंग उद्योग
‘फॅब्रिकेशन’ हा एका लोखंडावर आधारित उद्योग आहे. लोखंडी वस्तूंपासून दैनंदिन जीवनासाठी आवश्यक वस्तू बनविणे, तुटलेल्या लोखंडी वस्तू ‘वेल्डिंग’द्वारे जोडणे, नवीन वस्तू बनविणे, त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात वस्तू आणि अवजारे तयार करणे, शेतीसाठी अवजारे तयार करणे असे प्रकार या उद्योगात येतात. शारीरिक कष्टाची तयारी असेल, तर ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगार तरुण, उद्योजक यांना फॅब्रिकेशनचा व्यवसाय आयुष्यभरासाठी चांगले काम देऊ शकतो.

मोठमोठ्या कंपन्या, कारखाने, उद्योग यांना ‘वेल्डिंग’ किंवा ‘फॅब्रिकेशन’च्या कामाची नेहमीच गरज भासते. वेल्डिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, कटर आणि टूल्स घेऊन हा व्यवसाय सुरू करता येतो. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्हाला स्वतःला किमान एक वर्ष एकाच ‘फॅब्रिकेशन’मध्ये प्रत्यक्ष काम करून अनुभव घ्यावा लागेल.
यानंतर एक किंवा दोन अकुशल मदतनीस घेऊन व्यवसाय सुरू करू शकता. खेड्यापाड्यात, शहरात तोडफोड झालेल्या वाहनांचे काम, दैनंदिन गरजेच्या वस्तू जसे की, तिजोरी, झुले, खुर्च्या, खाटा इत्यादी बनविण्याचे काम ‘फॅब्रिकेशन’च्या उद्योगात केले जाते. कच्चा माल आणून तिजोरी, खाटा, खुर्च्या यांसारख्या वस्तू आपण बनवून त्यावर स्वत:च्या ब्रँडचे लेबल लावून फॅब्रिकेशन कारखान्यांसमोर तुमचे स्वतःचे दुकान सुरू करू शकता. असा माल देणाऱ्या व्यापाऱ्यांना घाऊक किंमतीत माल देऊ शकता. फॅब्रिकेशन व्यवसायात ग्राहक शोधण्याची गरज भासत नाही. ग्राहक तुम्हाला शोधत येतो. वेल्डिंग, फॅब्रिकेशनच्या कामाचे मजुरी दर जास्त असल्यामुळे, केलेल्या कामाची चांगली किंमत देखील मिळते. फॅब्रिकेशनच्या कामात ‘गॅस वेल्डिंग’ आणि ‘इलेक्ट्रिकल वेल्डिंग’ हे दोन प्रकारचे वेल्डिंग आहेत. या प्रकारच्या वेल्डिंगचा वापर दोन धातूंना जोडण्यासाठी केला जातो.

स्टेनलेस स्टील, पोलाद, लोखंड हे धातू चांगल्याप्रकारे ‘वेल्ड’ करू शकतात. दैनंदिन जीवनातील धातूच्या सामग्रीची झीज झाल्यानंतर ते पुन्हा ‘वेल्डेड’ केले जातात. वेल्डिंगचा वापर व्यावसायिक कारणांसाठीही केला जातो.
बहुमजली इमारती बांधताना तसेच मोठी घरे, बंगले, त्यांची दारे, खिडक्या, ग्रील्स, कात्री, शटर इ. गोष्टी वेल्डिंगद्वारे केली जातात. ‘आर्क वेल्डिंग’चा वापर वस्तू जोडण्यासाठी किंवा संयुक्त काम करण्यासाठीदेखील केला जातो.
फॅब्रिकेशनचे काम शिकण्यासाठी सरकारी किंवा खासगी आयटीआय संस्थांमध्ये शीट मेटल, वेल्डरचा अभ्यासक्रम शिकवला जातो. हे एक वर्षाचे प्रशिक्षण घेऊन किंवा फॅब्रिकेशन कारखान्यामध्ये कमीत कमी एक वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेऊन व्यवसाय सुरू करता येतो. फक्त स्थानिक कंपन्या, कारखाने त्यांचे फॅब्रिकेशनचे काम देऊ शकतात. त्यासोबत स्थानिक किंवा शहरातील लोखंडाच्या व्यापाऱ्यांना तिजोरी, खाटा, झुले, कपाटे, खुर्च्या बनवून देता येतील. गावातील घरे, बंगल्यांचे ग्रील, खिडक्या, दरवाजे बनवून देता येतील. दुकानाचे शटर, लोखंडी कॅबिनेट तयार करून देता येतील. लोखंडी पत्रे, कोन, वेल्डिंगसाठी रॉड, लोखंडी पट्ट्या हा यासाठी लागणारा कच्चा माल असेल. वेल्डिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, कटर, गॅस वेल्डिंग, ग्रीप, केबल्स, होल्डर, इलेक्ट्रो रॉड्स, गॅस कटर, मापन टेप, वेल्डिंगसाठी वापरण्यात येणारी छोटी मोठी साधने अशी यंत्रसामग्री आपणास लागेल.