
राज्य सरकारकडून मंगळवारी १० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. नागपूर येथील वस्त्रोद्योग विभागाचे संचालक पी. सीवा संकर यांची शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली झाली आहे. महापारेषणचे अध्यक्ष दिनेश वाघमारे यांची मंत्रालयात गृह विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली झाली असून तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात पशुसंवर्धन, दुग्धविकास विभागाच्या सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे.

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची मंत्रालयात वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी, तर अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य कर विभागाचे सहआयुक्त जी. श्रीकांत यांची छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या आयुक्तपदी, तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य कर विभागाच्या सहआयुक्तपदी बदली झाली. राधिका रस्तोगी यांची मंत्रालयात अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिवपदी, मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची महापारेषणच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी, तर श्रावण हर्डीकर यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी निवड झाली आहे.