
जपानमधील महिलांच्या सुरक्षेसाठी नवे विधेयक मांडण्यात आले आहे. हे विधेयक मंजूर होऊन कायदा झाल्यास जपानमध्ये स्कर्ट किंवा इतर कपड्यांमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो काढल्याप्रकरणी दोषी आढळणाऱ्या व्यक्तीला 3 वर्षांपर्यंतची शिक्षा आणि लाखो रुपयांचा दंड होऊ शकतो. जनतेच्या मागणीवरून हे विधेयक संसदेत आणण्यात आले आहे.
हे विधेयक आणण्यामागे महिलांशी संबंधित गुन्हे रोखणे हा हेतू आहे. या देशांमध्ये यासाठी शिक्षाही निश्चित करण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक महिलांची मोबाईलवर छायाचित्रे काढतात. ही छायाचित्रे ‘पॉर्न’ संकेतस्थळाला विकतात. त्या महिलेची बदनामी होते. या प्रकारच्या कृतीला ‘अपस्कर्टिंग’ असे म्हणतात. जपानमध्ये या गुन्ह्याचा बलात्काराच्या श्रेणीत समावेश केला जात आहे. स्थानिक ‘जपानी’ भाषेत त्याला ‘चिकन’ म्हणतात.
‘जपान टुडे’च्या वृत्तानुसार, गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी, चित्रपटगृहे आणि स्टेडियममध्ये असे गुन्हे अनेकदा घडतात. जपानमधील मेट्रो ट्रेनमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. येथे महिला गुन्हेगारांच्या घाणेरड्या मानसिकतेचा बळी ठरत आहेत.
याकरिता या विधेयकात कडक तरतूद करण्यात आली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जामिनासाठी कडक अटी लागू राहतील. त्याची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केल्यानंतर त्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल. त्यावर न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यात सर्व अहवाल सादर केले जातील. दोषी आढळल्यास किमान 3 वर्षे शिक्षा आणि 18 लाख रुपये दंड होऊ शकतो. दंड न भरल्यास आणखी 1 वर्षाची शिक्षा भोगावी लागेल.
दरम्यान, असे गुन्हे रोखण्यासाठी जपानी मोबाईल फोन निर्मात्यांनी ‘ऑडिबल शटर साउंड’ तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. यामध्ये फोटो क्लिक करताच आवाज ऐकू येईल. यामुळे महिला आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही हालचालींबाबत सतर्क होतील, आणि तात्काळ पोलिसांकडे तक्रार करू शकतील.