घड्याळ दुरुस्ती व्यवसाय
घड्याळ ही प्रत्येक व्यक्तीच्या गरजेची वस्तू आहे. घड्याळाची इतकी सवय झालेली आहे की कधी ते बंद पडले तर दिवस थांबल्यासारखा वाटतो. व्यक्ती अस्वस्थ होऊन जाते. घड्याळाची दुरुस्ती करण्यास विलंब न लावता घड्याळ दुरुस्तीची दुकाने शोधली जातात. घड्याळ दुरुस्त झाल्यावरच मन शांत होते.

घड्याळ दुरुस्तीचा व्यवसाय आजकाल फार गरजेचा झालेला आहे. या व्यवसायासाठी कौशल्य आणि घड्याळातील साधनांची माहिती असणे आवश्यक असते. यामुळे मोठी रोजगार निर्मिती होते. लोक या व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळवितात. आपणास घड्याळ दुरुस्ती व्यवसायात स्वारस्य असल्यास, जिथे व्यवसाय सुरु करायचा आहे तेथील बाजारपेठेचा अभ्यास करावा. बाजारात आणखी कोणती घड्याळ दुरुस्ती दुकाने उपलब्ध आहेत का, त्यांचे काम कसे आहे, ग्राहकांचा त्यांच्याविषयीचा अनुभव काय आहे, हे जाणून घ्यावे.
आजकाल वापरकर्त्यांद्वारे कोणती घड्याळे खरेदी केली जातात, याबद्दल जाणून घ्यायला हवे. हा व्यवसायाला विकसित होण्यास भरपूर वाव आहे; परंतु आपली प्रारंभिक गुंतवणूक आणि संसाधनांची व्यवस्था करण्याची क्षमता लक्षात घेऊन आपल्या घड्याळ दुरुस्तीच्या दुकानातील प्रारंभिक रचना निश्चित करायाला हवी. आपण ऑफलाइन काम करणार आहात की ऑनलाइन करणार आहात, हे ठरवावे. आपण सुरुवातीला आपल्या घरांमध्येसुद्धा दुरुस्तीचे काम करू शकता. घड्याळाच्या दुरुस्तीचे दुकान उघडण्यासाठी आपल्याकडे घड्याळे आणि हार्डवेअरविषयी बरीच माहिती असणे आवश्यक आहे. आपण त्यात तज्ज्ञ होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
आपल्याकडे मेकॅनिकल पदवी असायला हवी. घड्याळाचे वेगवेगळे भाग आणि त्यांच्या वापराबद्दल जाणून घ्या. नवीन तंत्रज्ञान विषयक प्रगतीबद्दल माहिती घ्या. या क्षेत्रात बदल होत आहेत. त्याविषयी स्वतःला अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे.

घड्याळ दुरुस्ती सुरु केल्यावर एखादा भाग उपलब्ध नसल्यास ग्राहकास घड्याळ नेण्यासाठी पुढील दिवस द्यावा. परंतु त्या दिवशी त्याचे घड्याळ दुरुस्त करून तयार ठेवावे. स्वतःची जागा नसल्यास आपल्याला भाड्याने जागा घ्यावी लागेल. जरी आपण घरातून काम करायचे ठरविले तरी त्यावर मर्यादा येतात. त्यामुळे दुकानाचे ठिकाण खूप महत्त्वाचे आहे. बाजारात नेहमी आपल्या व्यवसायाला मोठी मागणी असते. आपण ‘वॉच शोरूम’ जवळ जागा भाड्याने घेऊ शकता; जेणेकरून जेव्हा ग्राहक इतर दुकानांना भेट देतात, तेव्हा त्यांना आपले दुकान दिसण्याची शक्यता असते. जेव्हा आपण एखादे ठिकाण भाड्याने घेत असाल, तेव्हा स्पर्धेबद्दल जागरूक रहा. जेथे घड्याळ दुरुस्तीची दुकाने कमी आहे, तेथे दुकान घालण्यास प्राधान्य द्या. आपण आपल्या दुकानात इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरत असताना सर्व सुरक्षा उपायांचे पालन केले असल्याचे सुनिश्चित करा. जरी हा एक लघु-व्यवसाय असला तरीही यासाठी गुंतवणूकीची आवश्यकता असते.
व्यवसाय परवाना, पुन:विक्री प्रमाणपत्र, व्यवसाय प्रमाणपत्र, इ. सारख्या काही परवानग्या घेण्याची आवश्यकता आहे. कोणताही व्यवसाय उघडण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी आवश्यक आहे. भरपूर चिकाटी आणि दृढ निश्चितीमुळे आपला व्यवसाय यशस्वी होणार हे नक्की !