
अमेरिकेत अवैध स्थलांतरितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आशिया आणि दक्षिण अमेरिकेच्या काही देशांमधील लोक सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मेक्सिकन लोकांपेक्षा जास्त आहेत. त्यामध्ये पेरू, व्हेनेझुएला, हैती, भारत आणि रशियामधील नागरिक मोठ्या संख्येने आहेत.
सन 2011 मध्ये 85 टक्के लोक मेक्सिकोचे होते. ते आता एक तृतीयांश पेक्षा कमी झाले आहेत. अमेरिकेत 11 मे पासून ‘नियम 42’ समाप्त होईल. या नियमाने ‘कोविड-19’ महामारीमुळे अमेरिकेत येणाऱ्या निर्वासितांना काही अतिरिक्त अधिकार दिले असून ते 11 मे रोजी संपणार आहेत. जानेवारीमध्येही बायडेन सरकारने निर्वासितांच्या नियमांमध्ये काही बदल केले. त्यानंतर अवैध स्थलांतरितांची संख्या थोडी कमी झाली; मात्र एप्रिलच्या मध्यापासून ही संख्या पुन्हा वाढताना दिसत आहे.
‘नॅशनल बॉर्डर पेट्रोल कौन्सिल’चे अध्यक्ष ब्रँडन जुड म्हणतात की, “दररोज सरासरी 7,200 स्थलांतरित सीमेवर पोहोचत आहेत. मार्चमध्ये ही संख्या 5,200 होती. अधिकारी शक्य तितक्या लवकर या स्थलांतरितांची चौकशी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. जे कायदेशीर निर्वासित नाहीत त्यांना त्वरित त्यांच्या देशात परत पाठविले जात आहे.”
डिसेंबरमध्ये अमेरिकेच्या सीमेवर थांबलेले 40 टक्के लोक हे क्युबा, हैती, निकाराग्वा आणि व्हेनेझुएला या चार देशांतील होते. मार्चमध्ये त्यांची संख्या केवळ ३ टक्क्यांवर आली होती. 5 जानेवारी रोजी सरकारने जाहीर केले की, या चार देशांमधून दर महिन्याला जास्तीत जास्त 30,000 लोक सीमा ओलांडू शकतात. जर त्यांनी ऑनलाइन अर्ज केला असेल आणि पुरेसा निधी असेल, तर त्यांना परत घेण्याचेही मान्य केले. मात्र, टेक्साससह अमेरिकेतील अनेक राज्यांनी या योजनेला विरोध केला आहे.
क्युबाने सोमवारी सांगितले की, ते आता आपल्या लोकांना परत घेतील. डिसेंबर 2020 नंतर त्यांनी बेकायदेशीर निर्वासितांना परत घेण्याचे मान्य केले आहे. ‘हैती’ची परिस्थिती बिकट आहे. तेथील हिंसाचार आणि गुन्हेगारीमुळे बेकायदेशीर निर्वासितांना विमानाने परत पाठवणे शक्य होत नाही.
अलीकडेच, यूएस अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी 2019 ते मार्च 2023 या कालावधीत 1.19 लाख भारतीय लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करताना पकडले गेले. त्यापैकी बहुतांश गुजराती होते, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.