
युक्रेनवरील हल्ल्यानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली पाश्चिमात्य देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले होते. ‘जी-7’ देशांनीही रशियन तेलाच्या आयातीवर किंमत मर्यादा घातली होती. असे असतानाही युरोप भारतातून रशियाचे तेल खरेदी करीत आहे. भारतामार्फत रशियाचे तेल खरेदी करून युरोप स्वत:च्या निर्बंधांचे उल्लंघन करीत असल्याचे बोलले जात आहे.
‘द हिंदू’ या इंग्रजी वृत्तपत्राने 4 एप्रिल रोजी आपल्या अभिप्राय पृष्ठावर एक अहवाल प्रकाशित केला असून युरोप, भारत आणि चीनचा कसा वापर करीत आहे, हे सांगितले आहे.
त्यात असे म्हटले आहे की, युक्रेन युद्धानंतर रशियाकडून भारताची तेल आयात 1350 टक्क्यांनी वाढली आहे. भारत हा युरोपचा सर्वात मोठा इंधन निर्यातदार बनला आहे. युरोपियन युनियन, जी-7 आणि ऑस्ट्रेलिया थेट रशियाकडून नाही, तर भारत आणि चीनमधून रशियाचे तेल घेत आहेत. पाश्चात्य देशांनी रशियाच्या तेलासाठी प्रति बॅरल किंमत मर्यादा गेल्या वर्षी 5 डिसेंबरपासून लागू केली आहे. असे असतानाही युरोप, भारत आणि चीनकडून अप्रत्यक्षपणे रशियाचे तेल खरेदी करीत आहे. युक्रेनवरील हल्ल्यावरून रशियावर पाश्चिमात्य निर्बंध घालण्यात चीन आणि भारत सामील झाले नाहीत. अशा परिस्थितीत दोन्ही देशांनी रशियाकडून तेल खरेदी तर ठेवलीच, पण खरेदीचे प्रमाणही वाढले.