हँगर्स निर्मिती उद्योग
‘हँगर्स’ ही प्रत्येक कुटुंबासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. स्टेशनरी किंवा कापड दुकाने, मॉल्स अशा ठिकाणी आज विविध प्रकारचे हँगर्स दिसतात. अलीकडे आकर्षक स्वरुपाचे, सुंदर दिसणारे फॅन्सी हँगर्स विक्रीसाठी आलेले आहेत. हँगर्स निर्मिती उद्योग हा एक कल्पनाशक्तीला वाव देणारा उद्योग आहे.

घरातील कपाटात नवीन किंवा इस्त्री केलेले कपडे खराब होऊ नये म्हणून ते लटकवण्यासाठी हँगर्सचा वापर करतात. आधुनिकीकरणाच्या युगात ग्रामीण भागातील बेरोजगारांनी रोजगाराच्या शोधात शहरात येऊन स्थायिक होण्यास प्राधान्य दिले आहे. मोठ्या इमारतींमध्ये राहणाऱ्या माणसांकडे कपडे सुकविण्यासाठी मोठी जागा उपलब्ध नसते. त्यामुळे फ्लॅटच्या गॅलरीत हँगर्सवर चिमटे लावून कपडे वाळवले जातात. प्रत्येक वेळी कपडे इस्त्री करणे शक्य होत नाही, त्यामुळे अनेक स्त्रिया आपले ओले कपडे धुतल्यानंतर झटकून हँगर्सवर लटकवतात. इस्त्री न करताही असे कपडे पुन्हा वापरण्यास योग्य होतात.
आजही हॅन्गर बनविण्याच्या उद्योगात पारंपरिक पद्धतीने लाकडी हँगर्स तयार केले जातात; पण लाकडी हँगर्सच्या तुलनेत प्लास्टिक हँगर्स, स्टील हँगर्स, ॲल्युमिनियम हँगर्स, फायबर फॅन्सी हँगर्सना बाजारात चांगली मागणी आहे.
कपडे लटकवण्यासाठी हँगर्स वापरल्याने कमी जागेत जास्त कपडे साठवता येतात. एकाच हँगरवर शर्ट, पँट, साडी यांसारखे अधिक कपडे लावता येतील अशा हँगर्सना जास्त मागणी असल्याने, आपणही असेच हँगर्स बनवण्याचा प्रयत्न करायला हवा.
हँगर्स तयार करण्यासाठी जास्त यंत्रसामग्रीची गरज नसते. ते शक्यतो हाताने तार वाकवून बनवितात. ॲल्युमिनियम किंवा स्टील हँगर्स बनवण्यासाठी हाताने तयार केलेली उपकरणे वापरली जातात. प्लास्टिक किंवा फायबर हँगर्स बनविण्यासाठी प्लास्टिक मोल्डिंग मशीनची आवश्यकता असते.

स्टील आणि ॲल्युमिनियम हँगर्स तयार करण्यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागेल. असे हँगर्स हाताने तार वाकवून आणि त्याला इच्छित डिझाइनचा आकार देऊन तयार करता येतात.
कमी भांडवलात उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी हँगर उत्पादन उद्योग हा एक चांगला पर्याय आहे. जर तुम्ही यंत्रसामग्रीशिवाय हँगर उद्योग सुरू केलात, तर तुम्ही एक छोटेसे दुकान सुरू करून स्टीलची तार आणि किरकोळ मार्गाने तयार केलेले हँगर्स विकू शकता. हँगर विक्रीसाठी ‘डोअर मार्केटिंग’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे हँगर्सची विक्री अधिक होते.
कपड्यांची दुकाने, टेलरची दुकाने, स्टेशनरीची दुकाने, मॉल्स, साडीची दुकाने येथे आपण हँगर्स विकू शकता. यासाठी स्टील वायर, ॲल्युमिनियम वायर, प्लास्टिक हॅंगर्ससाठी कच्चे प्लास्टिक, डाय, मोल्ड, लाकूड पट्ट्या, प्लास्टिक कोटिंग पावडर, वायर बेंडिंग साहित्य, प्लास्टिक वायर, क्लिप हा कच्चा माल लागेल. प्लास्टिक मोल्डींग मशीन, हँडमोल्डींग मशीन ही यंत्रसामग्री या उद्योगासाठी लागते.