कारागृहातील वस्तूंची होणार ऑनलाईन विक्री
रागाच्या आवेशात कळत-नकळत व्यक्तीच्या हातून गुन्हा घडतो. शिक्षेनुसार त्यांना त्यांचे पुढील आयुष्य कारागृहातील बंदिवासात घालवावे लागते. यापैकी काही कैद्यांमध्ये सुप्त कौशल्ये दडलेली असतात. कारागृह प्रशासनामार्फत त्यांच्या कलेस वाव देऊन शेतीपासून हस्तकलेपर्यंतच्या अनेक वस्तू बनविल्या जातात. वर्षातून एकदा या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात येते; मात्र त्यांना ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता कारागृह प्रशासनाने या वस्तूंची ऑनलाईन विक्री करण्याचे ठरविले असून, त्या अनुषंगाने कंपन्यांशी बोलणी सुरु आहेत.

राज्यातील कारागृहांमध्ये कैदी हातमागावरील कपडे, लाकडी वस्तू, चपला, मुर्त्या, विविध प्रकारची लाकडी टेबल, खुर्च्या, कपाट, लेदर बॅग, सँडल, पर्यावरणपूरक पिशव्या, बेकरीचे वेगवेगळे पदार्थ अशा अनेक वस्तू तयार करतात. या वस्तूंच्या विक्रीसाठी कारागृहात प्रदर्शन भरविले जाते; मात्र, त्याला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. यासाठीच महाराष्ट्रातील कारागृहातील कैद्यांनी बनवलेली ही उत्पादने फ्लिफकार्ट, ॲमेझॉन, मार्ट अशा ऑनलाईन पोर्टलवर ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहेत. कारागृह प्रशासनाने या वस्तूंचे दरपत्रकही तयार केले आहे. याद्वारे ४०० हून अधिक वस्तूंची ऑनलाईन विक्री करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत या वस्तू ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध असतील.

कारागृहामध्ये सुतारकाम, शिवणकाम, विणकाम, रंगकाम, लोहारकाम, मूर्ती काम, यंत्रमाग, हातमाग, चर्मकला, धोबीकाम, बेकरी, कागद कारखाना, रसायन उद्योग, इत्यादी उद्योग चालवले जातात. मागील वर्षी कारागृहातील उद्योग आणि शेतीपासून कोट्यवधी रुपयांचे उत्पादन मिळाले आहे.
राज्याच्या कारागृहातील वस्तू देशभर पोहोचण्यासाठी कारागृह प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले आहे, असे राज्य कारागृह विभाग, अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता म्हणाले आहेत.