ड्रॅगन फ्रूट लागवड
‘ड्रॅगन फ्रूट’ हे एक विदेशी फळ आहे. या फळात भरपूर फायबर, फॉस्फरस आणि पोषकद्रव्ये असतात. त्यामुळे डॉक्टरसुद्धा रुग्णांना हे फळ खाण्याचा सल्ला देतात. या फळास आता मागणी वाढली आहे. भारतात फक्त काही राज्यांमध्ये या फळाची लागवड केली जाते.

‘ड्रॅगन फ्रूट’च्या लागवडीसाठी कोणत्याही विशेष वातावरणाची आवश्यकता नसते. निवडुंग प्रकारातील ही वनस्पती साधारण उष्ण कटिबंधीय हवामानात वाढते. या वनस्पतीला फारसा पाऊसही लागत नाही. मातीचा दर्जासुद्धा फारसा चांगला नसला तरी चालू शकते. ‘ड्रॅगन फ्रूट’ च्या रोपांना जास्त सूर्यप्रकाश लागत नाही. म्हणून झाडावर सावलीसाठी पत्रे उभारावे लागतात. हे पीक विविध प्रकारच्या जमिनीमध्ये घेता येते. पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होणारी जमीन यासाठी अधिक योग्य असते. वालुकामय जमीन, चिकणमाती सोबत अधिक सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन या पिकास अधिक पूरक आहे.
अलीकडे महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड आदी राज्यातील शेतकरी ‘ड्रॅगन फ्रूट’ची लागवड करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या फळाचे मूळ उष्ण कटिबंधीय भागातील मेक्सिको आणि दक्षिण अमेरिका हे आहे. जगातील बऱ्याच देशांमध्ये याची लागवड केली जाते.

ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून आर्थिक अनुदान दिले जाते. हरियाणा सरकार शेतकऱ्यांना प्रति एकर 1 लाख 20 हजार रुपये अनुदान देत आहे. एका शेतकऱ्याला 10 एकरासाठी अनुदान मिळते. या रकमेमध्ये ‘ट्रेलीझिंग सिस्टीम’साठी एकरी 70 हजार रुपये आणि ‘ड्रॅगन फ्रूट’ रोपे लावण्यासाठी 50 हजार रुपये दिले जातात. दुसरीकडे, बिहार सरकार शेतकऱ्यांना 40 टक्क्यांपर्यंत अनुदान देत आहे.
जर 1 एकर जमिनीवर ‘ड्रॅगन फ्रूट’ ची लागवड करण्याचा विचार करीत असाल, तर तुम्ही वर्षाला 8 ते 10 लाख रुपये सहज कमवू शकता.