झाडू बनविण्याचा व्यवसाय
झाडू बनविण्याचा व्यवसाय हा सर्वत्र चालणारा एक व्यवसाय आहे. मागणी, पुरवठा, किंमत, स्पर्धक, ग्राहक सर्वेक्षण या व्यवसायासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजारपेठेचे संशोधन करणे गरजेचे असते.

घर,व्यवसाय, कार्यालय अशा प्रत्येक ठिकाणी झाडूची गरज असते. झाडू ही अगदी प्राथमिक गरज आहे. स्वच्छतेच्या कामात झाडू मोलाची भूमिका बजावते. झाडूचे उत्पादन करणाऱ्या खूप साऱ्या उत्पादन कंपन्या आहेत. त्यामुळे तुम्ही या व्यवसायात इच्छुक असाल तर तुम्हाला ग्राहकांची मागणी लक्षात घेणे गरजेचे आहे. ग्राहक किती सहजतेने तुमचे उत्पादन वापरू शकतो याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन तंत्रज्ञान या उत्पादनामध्ये वापरू शकता, याचा विचार केला पाहिजे.
कॉर्न ब्रूम, पुश ब्रूम, प्लॅस्टिक ब्रूम, स्टॅंडर्ड ब्रूम, अँगल ब्रूम, रबर ब्रूम, वॉटर ब्रूम इत्यादी प्रकारच्या झाडू असतात. वेगवेगळे झाडू असतात. त्यातील तुम्ही विशिष्ट अशा 1-2 झाडूचे उत्पादन करू शकता. किंवा सगळ्या प्रकारामध्ये उत्पादन करू शकतात.
वेगवेगळ्या झाडूंच्या प्रकारानुसार कच्चा माल आवश्यक असतो. चांगल्या प्रतिच्या झाडूसाठी सुकलेला हिर लागेल. तुम्ही प्लास्टिकची झाडू बनवत असाल तर त्यानुसार वेगळी सामग्री लागेल. हा कच्चा माल तुम्हाला स्थानिक बाजारपेठ आणि ऑनलाईन दोन्हीकडे उपलब्ध आहे. या व्यवसायात कटर, स्वयंचलित ब्रूम मशीन, बिंडर, इतर टूल्स आणि उपकरणे आवश्यक असतात. यंत्रसामग्रीमध्ये अर्धस्वयंचलित आणि स्वयंचलित अश्या 2 प्रकारची यंत्रसामग्री गरजेची असते. या व्यवसायात तुम्ही 3 ते 8 लाख रुपये गुंतवणूक करून मध्यम आकाराचा व्यवसाय सुरू करू शकता. या गुंतवणुकीमध्ये परवाना खर्च, खेळते भांडवल, पगार, कच्च्या मालाची किंमत, यंत्रसामग्री खर्च, इतर गुंतवणूक खर्च यात समाविष्ट आहे.

जर तुम्हाला कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्हाला 50 हजार ते 1 लाख रुपये इतकी गुंतवणूक करावी लागेल. एखाद्या कंपनीला विशिष्ट प्रकारची झाडू बनवून पाहिजे असेल, तर त्यांना त्यांच्या गरजेनुसार झाडू बनवून देऊ शकता. झाडू बनविण्याच्या व्यवसायासाठी लागणारी जागा आणि मनुष्यबळ हे उत्पादनाच्या प्रमाणावर आणि कोणत्या प्रकारचे झाडू तयार केले जात आहे, यावर अवलंबून असते. तथापि, ढोबळमानाने किमान 700 ते 1000 चौरस फूट जागा आणि 5 ते 10 कामगार लहान आकाराचा झाडू बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेसे असतील. आपल्याला कुशल कामगारांची आवश्यकता असेल जे यंत्रे-उपकरणे चालवू शकतील. या व्यवसायासाठी उद्योग आधार, जीएसटी क्रमांक, ट्रेडमार्क, विद्युत परवाना, इतर दस्तऐवजीकरण या गोष्टी आवश्यक आहेत.