
श्री क्षेत्र औदुंबर हे श्री दत्तात्रेयांचे जागृत स्थान सांगली जिल्ह्यात आहे. तासगाव तालुक्यात ‘भिलवडी’ गावाजवळ ‘कृष्णा’ नदीच्या काठी निसर्गाच्या सहवासात हे सुंदर मंदिर उभे आहे. औदुंबर हे पश्चिम महाराष्ट्रातील आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. दत्तावतार नृसिंहसरस्वतींचे हे स्थान आहे. याठिकाणी वर्षभर विविध धार्मिक विधी संपन्न होतात. अनेक दत्तभक्तांची येथे वर्षभर वर्दळ असते.
औदुंबर येथील कृष्णेचा डोह सुंदर आहे. डोहातील पाणी कमी झाल्यावर सिध्दनाथाचे मंदिर दृष्टीस पडते. नृसिंह-सरस्वातीच्या निर्वाणदिनी फुलांनी सजविलेला पाळणा या डोहात सोडला जातो. याच्या बाजूस बांधण्यात आलेला सुंदर घाट मनोहर आहे.
औदुंबरमधील कृष्णेच्या घाटालगत श्रीगुरू शिवशंकरानंद आश्रमाची प्रशस्त वास्तू आहे. या आश्रमात वेदाचे अध्ययन होते. त्यांना पौरोहित्याचे शिक्षण दिले जाते. आश्रमात अनमोल असे संस्कृत ग्रंथ आहेत.

येथे महायोगी ब्रह्मानंद महाराजांचा जुना मठ आहे. येथे दत्तमूर्ती शिवस्वरूपात प्रतिष्ठापित आहे. येथील शंकराची पिंड वैशिष्टयपूर्ण आहे. येथे श्री भुवनेश्वरी मंदिर आहे. नृसिंह सरस्वती औदुंबर येथे येण्यापूर्वीपासून हे मंदिर भुवनेश्वर येथे आहे. हे मंदिर दगडी असून हेमांडपंथी आहे. मंदिर परिसरात दगडी बुरूज, दगडी दीपमाळा, हनुमान, गणपती,काळभैरव, महादेवाचे छोटे मंदिर या मंदिराचा परिसर विलोभनीय जाणवतो. हे मंदिर म्हणजे वास्तुशिल्पाचा वैशिष्टयपूर्ण नमुना आहे. येथील सौंदर्य अप्रतिम आहे. दर्शनासाठी येणारे भाविक येथे आल्यावर त्यांचे मन प्रसन्न होते.