शाम्पू उत्पादन
कोणत्याही उद्योग-व्यवसायात अनुभव हा मोठा शिक्षक असतो. जर तुम्ही उद्योग करायचे निश्चित केले असेल, तर आज आधुनिकीकरणामुळे हजारो नवीन व्यवसायसंधी निर्माण झाल्या आहेत. पारंपरिक राहणीमानात बदल झाल्यामुळे माणसाच्या गरजा आणि सवयीसुद्धा बदलल्या आहेत. हजारो गैर-व्यावसायिक उत्पादने बाजारात यशस्वी व्यवसाय करताना दिसतात. यापैकी एक उद्योग म्हणजे शाम्पू उत्पादन उद्योग होय.

पारंपरिक व्यवसायांपासून दूर जात आधुनिक उत्पादने तयार करण्याकडे आपला कल त्या व्यावसायिकांनी ठेवला आहे. कमी भांडवलात उद्योग निर्माण करून स्वत:चा आणि अप्रत्यक्षपणे देशाचा विकास करण्यासाठी लघुउद्योजकांना ही उत्पादने मदत करतात. जपान, चीन, कोरिया, इंडोनेशिया हे देश अशा लघुउद्योग आणि गृहउद्योगात अग्रेसर आहेत.
हेअर वॉश शाम्पू, हँड वॉश शाम्पू, मोटर वॉश शाम्पू अशी वेगवेगळी उत्पादने बाजारात आहेत. बाजारात हात धुण्याच्या शाम्पूची वेगवेगळी उत्पादने आहेत. हात धुण्याचे शाम्पू आणि केस धुण्याच्या शाम्पूमध्ये जवळजवळ समान सूत्र वापरले जाते. शाम्पू बनविण्यासाठी रंग, सुगंध, ग्लिसरीन आणि पाणी या कच्च्या मालाची आवश्यकता असते.
गाडी धुण्याचा शाम्पू तयार करताना साधारणपणे 10 लिटर उत्पादनासाठी १० किलो एसएलआयएस, 100 ग्रॅम शाइनोकर, 20 ग्रॅम रंग, 50 ग्रॅम सुगंध असे साहित्य वापरले जाते. हे सर्व मिश्रण एकत्र करून चांगले मिसळले जाते. अशा प्रकारे गाडी धुण्याचा शाम्पू तयार केला जातो. बाजारातील मागणीनुसार तो आकर्षक बाटल्यांमध्ये वेष्टनबंद करून विक्रीसाठी आणला जातो.
धुरामुळे, धुळीमुळे खराब झालेले केस धुण्यासाठी, केसांना मुलायमपणा आणण्यासाठी, केस निर्जीव बनले असतील तर लोक शाम्पूचा वापर करतात. ग्राहकांच्या आणि बाजाराच्या मागणीनुसार केस धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शाम्पूमध्ये आवळा, शिककाई यांसारख्या औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींचे अर्क टाकले जातात. आकर्षक पाकिटे आणि बाटल्यांमधून उत्पादन बाजारात विक्रीसाठी आणले जाते. शाम्पू विक्रीसाठी बाजारात मोठ्या कंपन्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धाही मोठी आहे. अशा उत्पादनांसाठी जाहिरातींचा आधार घ्यावा लागतो.

आपण उद्योग करताना दर्जेदार उत्पादन तयार करा. जनमानसावर परिणाम करणारी जाहिरात करून बाजारात उतरवा. वितरण व्यवस्थेचे योग्य नियोजन करा. प्रत्येकजण केस धुण्यासाठी शाम्पू वापरतो. किराणा दुकाने, औषधांची दुकाने, मॉल्स येथे विक्रीला ठेवा. किराणा दुकान, औषधांची दुकाने, मॉल्स अशा ठिकाणी थेट जा. इतर उत्पादनांपेक्षा तुमचे उत्पादन कसे चांगले आहे, हे त्यांना समजावून सांगून मागणी मिळवा.
घाऊक व्यापाऱ्यांनाही आपण माल देऊ शकता. या उद्योगासाठी एसएलआयएस, सुगंधित द्रव्य, परवानगी असलेला रंग, ग्लिसरीन, पाणी यांसारखा कच्चा माल सूत्रानुसार घ्यावा. यासाठी मोठा मिक्सर, पाकिटे वेष्टनबंद करण्यासाठी यंत्र, ड्रम बॅरल, टॅप यांसारखी यंत्रसामग्री आवश्यक असेल.