नवी मुंबई पालिका उभारणार शिवरायांचा पुतळा
नवी मुंबई महापालिकेने ‘नेरुळ सेक्टर-१’ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचा कायापालट केला आहे. या चौकात आकर्षक देखाव्यांसह छत्रपती शिवरायांचा सिंहासनारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची परवानगीही महापालिकेला मिळाली आहे. याकरिता पालिका अभियंता विभागाकडून येथील चौकाच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

नेरुळ येथे असलेल्या गोलाकार चौकाची सर्व बाजूंनी रुंदी कमी केली आहे. याच परिसरात विविध शैक्षणिक संस्था तसेच डी. वाय. पाटील स्टेडियम असल्याने या परिसराला अधिकच आकर्षक रूप येणार आहे. याठिकाणी पुतळा उभारण्याची मागणी माजी महापौर जयवंत सुतार तसेच कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे देवनाथ म्हात्रे यांनी केली होती. नवी मुंबई या शहराला आकर्षक आणि देखणे रूप देण्याचे काम महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. शिवरायांचा पुतळा उभारल्यानंतर हा चौक अधिक आकर्षक होणार आहे.

शिवरायांच्या या सिंहासनारूढ पुतळ्याचे काम वेगाने होत असून येथील सर्व कामांसाठी जवळजवळ १.०६ कोटीपेक्षा अधिकचा खर्च करण्यात येत आहे. यामध्ये ६५ लाखांपेक्षा अधिक खर्च चौकाच्या सुशोभीकरणावर करण्यात आला आहे. पुतळा उभारण्यासाठी जवळजवळ ३५ लाखांचा खर्च येणार आहे.