नाशिकमध्ये विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राचे वाटप
नाशिक जिल्ह्यातील 9 हजारहून अधिक विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यामध्ये ३६६२ वैधता तर ५६९७ जात प्रमाणपत्रांचा समावेश आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने महिनाभर सामाजिक न्याय पर्व उपक्रमांतर्गत मोहीम राबविली होती. इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे आणि बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांच्या निर्देशानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने ही मोहीम राबविली. नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून ३६६२ विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ऑनलाईन निर्गमित करण्यात आले. उपविभागीय अधिकारी यांच्याकडून ५६९७ जात दाखले निर्गमित करण्यात आले आहेत.

कोणत्याही अर्जदाराने त्रस्त व्यक्तींच्या अमिषास बळी पडू नये. अन्य कार्यालयाबाहेरील व्यक्तीशी संपर्क करू नये. यामुळे फसवणूक होऊ शकते, असे आवाहन समितीने केले आहे. दरम्यान, ज्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, आदी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाईन अर्ज बार्टीच्या संकेतस्थळावर भरणे गरजेचे आहे. सर्व मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रती आणि मूळ शपथपत्रांसह ते अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिकच्या नागरी सुविधा केंद्रात कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत स्वतः किंवा कुटुंबियांमार्फत जमा करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे.