
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शुक्रवारी इयत्ता 12 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. यावेळी 87.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.38 टक्केने कमी आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, बोर्डाने विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांच्या आधारे प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणी देण्याची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यार्थ्यांमधील स्पर्धा टाळण्यासाठी सीबीएसई कोणतीही गुणवत्ता यादी जाहीर करणार नाही, असे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. बोर्ड विविध विषयांमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या ०.१ टक्के विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्रमाणपत्रे देणार आहे. गेल्या वर्षी ९२.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
यावेळी मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 90.68% आहे. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 84.67% होती. विद्यार्थी निकाल तपासण्यासाठी results.cbse.nic आणि cbseresults.nic.in या दोन संकेतस्थळावर भेट देऊ शकतात. मागील वर्षी ९४ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या. यावर्षी केवळ ९०.६८ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम त्यांचा बैठक क्रमांक नमूद करावा.
संकेतस्थळावर जाऊन ‘सीबीएसई 12वी निकाल थेट लिंक’ वर क्लिक करावे. लॉगिन पृष्ठावर, बैठक क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करावी. तुमचा सीबीएसई बोर्डाचा निकाल स्क्रीनवर दिसेल. विद्यार्थी येथून निकालाची डिजिटल प्रत डाउनलोड करून घेऊ शकतात.