
‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या लोकप्रिय हिंदी मालिकेचा तिसरा भाग ‘डिज्नी प्लस हॉटस्टार’ वर दिनांक २६ मे रोजी प्रदर्शित होईल, अशी घोषणा स्ट्रीमरने गुरुवारी केली. स्ट्रीमिंग सेवेने तिच्या समाजमाध्यमांवर तिसऱ्या पर्वाची तारीख अधिकृत ट्रेलरसह शेअर केली आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांमध्ये उत्कंठा निर्माण झाली आहे.
नागेश कुकुनूर दिग्दर्शित हा शो गायकवाड कुटुंबातील कलहाच्या कथेचा पाठपुरावा करतो. एका राजकीय व्यक्तिरेखेवर हत्येचा प्रयत्न केल्यानंतर तो वाद उफाळून येतो. यात अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सचिन पिळगावकर, सुशांत सिंग, एजाज खान, रणविजय सिंगा हे कलाकार आहेत. नवीन भागामध्ये अमेय गायकवाड (कुलकर्णी) आणि पूर्णिमा गायकवाड (बापट) त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपासून आणि बाह्य शक्तींपासून त्यांच्या वारशाचे रक्षण करण्यासाठी एकत्र येताना दिसतील.

प्रिया बापट या भूमिकेविषयी म्हणते, ”मला पौर्णिमाचे पात्र अत्यंत गुंतागुंतीचे, भावनिक वाटते. सर्व भागांमध्ये काम करताना खूप आनंद झाला. शिवाय अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर यांसारख्या अनुभवी अभिनेत्यांसोबत काम करणे हा एक अविश्वसनीय अनुभव होता. या भागामध्ये मी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांची वाट पाहत आहे.”
या मालिकेचा पहिला भाग मे 2019 मध्ये आला होता. या मालिकेमध्ये काम करणे हा एक सर्जनशील समाधानकारक अनुभव आहे. या भागामध्ये अमेयने पौर्णिमासोबत शेअर केलेल्या नातेसंबंधाची नवीन भूमिका प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.