बॉलपेन निर्मिती
आजच्या आधुनिक स्पर्धेच्या युगात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याने लोकांना शिक्षणाचे महत्त्व चांगले पटले आहे. चांगले जीवन जगण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन ग्रामीण किंवा शहरी भागातील एकही पालक आपल्या मुलांचे दहावीपूर्वीचे शिक्षण थांबवत नाहीत. प्रत्येक घरातील मुलगा असो वा मुलगी किमान दहावीपर्यंत शिक्षण घेताना दिसतात. पेन ही प्रत्येक घराची, प्रत्येक माणसाची गरज आहे. प्रत्येक माणसाला त्यांच्या दैनंदिन जीवनात कोणत्या ना कोणत्या कारणासाठी पेन हवा असतो. प्राचीन काळी लेखन दौत आणि टाक याने ते तयार केले जात असते. 25 – 30 वर्षापूर्वी शाई पेनचा वापर होत असे. शाई पेनसाठी शाईचा गोळा, निप्पल, झिप असे साहित्य आवश्यक असायचे. पण आजच्या आधुनिक युगात शाईच्या पेनची जागा बॉलपेनने घेतली.

शाईच्या पेनाची शाई संपली की त्यात शाई भरावी लागत असे. शाई भरताना अनेक वेळा कागदावर आणि कपड्यांवर शाईचे डाग पडत असत. पेनची निप्पल्स, झिप तुटायची. बॉलपेनमुळे या त्रासातून सुटका झाली. बॉलपेन वापरण्यास अतिशय सोपे, सोयीस्कर असल्याने विद्यार्थ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत, बँक, कार्यालये, कार्यालयातील सर्व कर्मचारी बॉलपेन वापरतात.
आपण बॉल पेन बनविण्याचा व्यवसाय निवडल्यास, बॉलपेनच्या विक्रीसाठी अमर्यादित बाजारपेठ उपलब्ध आहे. तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकता. तुम्हाला तुमच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी बाजारपेठ शोधण्याची गरज नाही; कारण तुम्ही तुमच्या वस्तूंचे उत्पादन सुरू करणार आहात त्याच्या आसपास एक बाजारपेठ उपलब्ध आहे. उत्पादनाच्या सुरुवातीला जवळची बाजारपेठ मिळाल्यास वाहतुकीचा खर्च कमी होतो. मागणीनुसार माल लवकर तयार करून पुरवठा करता येतो.
शहरी भागातील ग्राहक आणि बाजारपेठेसाठी आकर्षक रंगांचे फॅन्सी बॉलपेन मॉडेल बनवा. नंतर ग्रामीण भागातील बाजारपेठेसाठी ब्रँडेड कंपन्यांच्या मॉडेल्सनुसार थोडे स्वस्त आणि टिकाऊ उत्पादन करा.

ग्राहकांच्या मागणीनुसार डिझाईनची विविध मॉडेल्स बाजारात विक्रीसाठी आणली तर तुमच्या मालाला अधिक मागणी येते. शक्य असल्यास, आपल्या मॉडेल्सना सुंदर नाव द्या. ज्या बॉलपेनचे उत्पादन करणार आहात, त्यानुसार बाजारपेठेची व्याप्ती निश्चित करावी लागेल. जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणार असाल तर शक्यतो जवळच्या मोठ्या बाजारपेठेतील घाऊक व्यापाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार माल तयार करून पाठवा. मालाचे उत्पादन कमी दर्जाचे असेल, तर तयार मालाचे स्वतः विपणन करून विक्री करा. स्थानिक बाजारपेठेतील स्टेशनरी दुकाने, किराणा दुकाने, पान शॉप्स, मॉल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स अशा ठिकाणी रोखीने वस्तू विकू शकता. आपला विक्री प्रतिनिधी नियुक्त करा. या व्यवसायासाठी पॉलिप्रॉपिलीन, निळी शाई, नोझल्स, प्लास्टिक पावडर, पॅकिंगसाठी प्लास्टिक पेपर कव्हर हा कच्चा माल आवश्यक असेल. यासाठी स्क्रीन प्रिंटिंग यंत्र, शाई भरण्याचे यंत्र, ओव्हन, बॉल पेन हँडमोल्डेड यंत्र, नोझल तयार करण्याचे यंत्र आदी यंत्रसामग्री गरजेची आहे.