
भारताच्या ‘जी-20’ अध्यक्षपदाअंतर्गत आज मुंबईत कोल इंडिया लिमिटेडच्या सहकार्याने, कोळसा मंत्रालयाने ‘जस्ट ट्रान्झिशन रोड मॅप’ या विषयावर आधारीत चर्चासत्राचे आयोजन केले आहे. तिसऱ्या ऊर्जा संक्रमण कार्यगटाच्या बैठकीचा एक भाग म्हणून या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात उद्घाटन सत्र आणि त्यानंतर पॅनेल चर्चा अशी 2 सत्रे होणार आहेत. कोळसा सचिव अमृतलाल मीना यावेळी होणाऱ्या चर्चेत सहभागी होणार असून या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष पदही भूषवतील. शाश्वततेसाठी संतुलित दृष्टिकोनाची गरज ओळखून या चर्चासत्रात जीवाश्म इंधन विशेषत: कोळशावर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थांवर चर्चा होईल. ते देशाच्या ऊर्जा सुरक्षेशी तडजोड न करता अधिक शाश्वत ऊर्जास्रोतांकडे सुरळीत आणि न्याय्य संक्रमण सुनिश्चित करण्यासाठीची धोरणे व उपक्रम, याबाबत सविस्तर ऊहापोह होणे अपेक्षित आहे.