साताऱ्यात होणार महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्र
सातारा जिल्ह्यात महाराष्ट्र पर्यटन पोलीस प्रशिक्षण केंद्र होणार आहे. गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य आपत्ती बचाव पथक युनिटअंतर्गत हे केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य शासनातर्फे घेण्यात आला आहे.

शासनातर्फे आपत्कालीन प्रसंगी बचावकार्य करण्यासाठी राज्य आपत्ती बचाव दलाची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत पोलीस बांधवांना बचावकार्याचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली जाणार आहे. या केंद्राच्या स्थापनेसाठी कोयना नदीच्या काठावर ३८.९३ हेक्टर जागा सातारा जिल्हा पोलीस दलास उपलब्ध करुन देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. राज्य आपत्ती बचाव दलासाठी आणि प्रस्तावित पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी २७१.४१ कोटी रुपयांच्या खर्चासही यावेळी मान्यता देण्यात आली.

या प्रशिक्षण केंद्रामुळे राज्याला हक्काचे आपत्ती बचावाचे प्रशिक्षण देणारे केंद्र उपलब्ध होणार आहे. नैसर्गिक आपत्तीत प्रामुख्याने पूर परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण याठिकाणी देणे शक्य होणार आहे.